Diljit Dosanjh On Sardarji 3 Controversy : आपल्या गायन आणि अभिनय शैलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा दिलजीत दोसांझ काही दिवसांपूर्वी एका वादात अडकला होता. त्यामुळे त्याला बॉयकॉट करण्याची मागणीही केली जात होती. हा वाद होता, तो ‘सरदार जी ३’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबर दिसल्याचा. ‘सरदारजी ३’चा ट्रेलर प्रदर्शित होताच दिलजीत दोसांझ पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम करीत असल्याचं दिसताच त्याच्यावर कलाकारांसह नेटकऱ्यांनीही टीका केली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही हानिया आमिरला या चित्रपटात कास्ट केल्याबद्दल त्याला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वादामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालेला नाही. वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी तो भारतात न दाखविण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आता स्वत: दिलजीतने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मलेशियातील एका कॉन्सर्टमध्ये, दिलजीतने पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याचा पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबरचा ‘सरदारजी ३’ चित्रपट आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना या विषयांवर आपली बाजू स्पष्ट केली. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एका प्रेक्षकाने भारताचा तिरंगा हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे, त्याच्याकडे पाहत दिलजीत म्हणतो, “तो माझ्या भारत देशाचा झेंडा आहे. त्याचा नेहमीच आदर करा”. पुढे तो स्टेजवर उभा राहून भारतीय झेंड्याला सलाम करताना दिसतो. त्यानंतर त्यानं प्रेक्षकांची परवानगी घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या. तो म्हणाला, “माझा चित्रपट ‘सरदारजी ३’ फेब्रुवारीमध्ये शूट झाला होता, तेव्हा सामने सुरू होते.”
दोषींना कडक शिक्षा मिळावी, हीच प्रार्थना : दिलजीत
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक प्रवासी होते. त्यावर दिलजीतने दुःख व्यक्त करीत म्हटले, “त्या हल्ल्यानंतर आणि अजूनही आम्ही कायम प्रार्थना करीत आलो आहोत की, दोषींना कडक शिक्षा मिळावी. फरक फक्त एवढाच आहे की, माझा चित्रपट हल्ल्याच्या आधी शूट झाला होता आणि क्रिकेट सामना त्यानंतर झाला.”
इतके दिवस गप्प का बसलो? यावर दिलजीतचं उत्तर
शेवटी दिलजीतने या सगळ्याविषयी इतके दिवस मौन का पाळले होते, यावरही प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल दिलजीत म्हणाला, “माझ्याकडे अनेक उत्तरं आहेत; पण मी गप्प बसलो. काहीही बोललो नाही. तुझ्याबद्दल जो कोणी काही बोलेल, त्याला योग्य वेळी उत्तर दे. लोकांचं विष आपल्या आत जाऊ देऊ नकोस – हे मी आयुष्याकडून शिकलोय. म्हणूनच मी काही बोललो नाही. अजून बरेच काही सांगायचं आहे; पण मी ते सांगू इच्छित नाही.”
‘बॉर्डर २’मध्ये दिलजीत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
दरम्यान, दिलजीतने नुकतेच ‘बॉर्डर २’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन व अहान शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.