Ramayana Fame Actress : नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रामायण या चित्रपटाची पहिली झलक ३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच डोळ्यांचं पारणं फेडणारा हा ट्रेलर सर्वांच्याच पसंतीस पडला आहे.
‘रामायण’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर राम यांची भूमिका साकारत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील राम म्हणजेच अभिनेते अरुण गोविल हे ‘रामायण’ चित्रपटात रामाचे वडील दशरथ यांच्या भूमिकेत साकारणार आहेत. त्यामुळे ‘रामायण’ मालिकेत राम म्हणून लोकप्रिय ठरलेले अरुण गोविल यांना वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहते उत्सुक आहेत.
अशातच अरुण गोविल यांच्या ‘रामायण’ चित्रपटामधील दशरथ यांच्या भूमिकेच्या कास्टिंगबद्दल ‘रामायण’ मालिकेतील त्यांची सहकलाकार दीपिका चिखलिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दीपिका यांनी अरुण यांना ‘रामायण’ चित्रपटात दशरथ यांच्या भूमिकेत पाहणं अनपेक्षित असल्याचं म्हटलं. तसंच दशरथ यांची भूमिका करणं ही त्यांची वैयक्तिक निवड असल्याचेही त्या म्हणाल्या.
दीपिका चिखलिया इन्स्टाग्राम पोस्ट
दीपिका चिखलिया यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी साधलेल्या संवादात याबद्दल असं म्हटलं. “मी अरुण यांना राम आणि स्वतःला सीतेच्या रूपात पाहिले आहे. त्यामुळे अरुण यांना आता दशरथ म्हणून पाहणं माझ्यासाठी थोडं अवघड आहे. राम ही भूमिका साकारल्यानंतर दशरथ यांची भूमिका करणं हा अरुण गोविल यांचा वैयक्तिक निर्णय असेल. पण एका गाजलेल्या भूमिकेनंतर पुन्हा दुसरी भुमिका स्वीकारणं हे खूप अवघड असतं.”
यापुढे त्यांनी सांगितलं, “जर तुम्ही रामाची भूमिका केली असेल आणि ती लोकप्रिय असेल, तर लोक तुम्हालाच कायम राम म्हणूनच ओळखतात.” यानंतर दीपिका यांनी त्यांना ‘रामायण’ चित्रपटासाठी विचारणा न केल्याबद्दल निराशादेखील व्यक्त केली. याबद्दल त्या म्हणाल्या, “मला यासाठी संपर्क साधण्यात आला नाही किंवा त्यांनी याबद्दल माझ्याशी बोलण्याची तसदीही घेतली नाही.”
पुढे त्यांनी हेही कबूल केले की, या चित्रपटात त्यांनी कोणतीच भूमिका केली नसती; कारण त्या स्वतःला सीतेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भूमिकेत पाहण्याची कल्पना करु शकत नाहीत. याबद्दल त्या म्हणाल्या, “मी महाभारत आणि शिवपुराणसारख्या इतर महाकाव्यांवर आधारित चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करण्यास तयार आहे, परंतु रामायणात नाही.”
दरम्यान, ‘रामायण’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाचं एकूण बजेट १,६०० कोटी रुपये आहे. चित्रपट दैन भागांत प्रदर्शित होणार असून पहिल्या भागासाठी ९०० कोटी रुपये खर्च येणार आहेत, तर दुसऱ्या भागासाठी ७०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असल्याचं वृत्त आहे.