Abhinav Kashyap reveals Salman Khan Fitness : ‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप आणि सलमान खानमधील वाद काही नवीन नाहीत. याआधी अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेकदा काही आरोप केले आहेत. अशातच आता त्याने पुन्हा एकदा सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधला आहे.

‘बॉलिवूड ठिकाणा’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सलमानच्या व्यायाम पद्धतीवर टीका केली. तसंच अभिनवने सलमान खान VFX द्वारे पडद्यावर स्वत:ची शरीरयष्टी सुदृढ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं.

‘दबंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या स्टंट सीनबद्दल सांगताना अभिनव म्हणाला, “सलमानला चिखलातून धावत जायचं होतं. पण तो शॉट त्याने नाकारला. कारण त्याला वाटलं की, गर्दीसमोर जर तो घसरला आणि पडला, तर लोक हसतील. त्याला फारसं धावताही येत नाही. सगळी धावायची दृश्यं बॉडी डबल वापरून केली गेली आहेत आणि नंतर चेहरा बसवला गेला.”

यापुढे त्याने सांगितलं, “सलमानच्या डोळ्यांखालील काळे डाग डिजिटलरीत्या काढण्यासाठी मी ८ लाख रुपयांचा खर्च केला होता. तो फारसा फिट नाही. शॉट आधी फक्त थोडेसे पुशअप्स करतो, म्हणजे पोट लपवता यावं. त्याचा फिटनेस फारसा चांगला नाही. काही सिनेमांमध्ये तर त्याचे ऍब्सदेखील खोटे VFX ने तयार केलेले होते, असं मी ऐकलं आहे.”

सलमान खान इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे अभिनव म्हणतो, “सेटवर त्याची खास जिम नव्हती. फक्त थोडेसे पुशअप्स करून शरीर फुलवायचा प्रयत्न करायचा. ‘दबंग’च्या वेळी तो थोडा ठीकठाक होता. तो काही स्टंट्स करत असे, पण जास्त धोकादायक शॉट्ससाठी बॉडी डबल वापरले जायचे.”

दरम्यान, अभिनव कश्यप आणि सलमान खानमधील वाद जुना असला, तरी अभिनवच्या या नव्या आरोपांमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आरोपांवर सलमान किंवा त्यांच्या टीमकडून अजून अधिकृत उत्तर आलेलं नाही.