Pahlaj Nihalani on Divya Bharti: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दिवगंत दिव्या भारतीची ओळख आहे. ‘नीला पानी’, ‘दिल का क्या कसूर’, ‘धर्मा क्षेत्रम’, ‘शतरंज’, ‘रंग’, ‘क्षत्रिय’, ‘दिल आशना है’, ‘दिवाणा’, अशा अनेक चित्रपटांतून दिव्या भारतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
अभिनेत्रीच्या अचानक निधनाने सर्वांना धक्का बसला होता. १९ व्या वर्षी अभिनेत्रीचे निधन झाले, त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तिच्या अकाली निधनाबद्दल आजही बोलले जाते.
“ज्यावेळी दिव्याचा मृत्यू झाला…”
आता चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिव्याच्या मृत्यूबद्दल तसेच त्या दिवसाबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी ‘शोला और शबनम’ या चित्रपटात दिव्याबरोबर काम केले होते. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “ज्यावेळी दिव्याचा मृत्यू झाला, त्यावेळी ती एकटी होती. तिच्याजवळ कोणीही नव्हते. मला जेव्हा घडलेल्या प्रकाराबद्दल समजले, तेव्हा मी तत्काळ दवाखान्यात पोहोचलो, पण दवाखान्यातदेखील ती एकटी होती. तिच्याजवळ कोणीही नव्हते.”
पुढे त्यांनी दिव्याबरोबर कशी ओळख झाली होती याबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले, “संगीतकार जतिन पंडित यांच्यामुळे माझी दिव्या भारतीबरोबर ओळख झाली होती. तो तिला माझ्याकडे घेऊन आला होता. जेव्हा मी तिचे फोटो पाहिले होते, तेव्हा त्या फोटोंमध्ये ती खूप जाड दिसली होती. तिचा चेहरा खूप मोठा दिसत होता. मी तिला वजन कमी करण्यास सांगितले आणि त्यानंतर भेटण्याचा सल्ला दिला.”
पहलाज निहालनी पुढे म्हणाले, “जतिन पुन्हा तिला माझ्याकडे फिल्म सिटीमध्ये घेऊन आला. तो म्हणाला की आता ती सुंदर दिसत आहे. पण, तोपर्यंत ‘शोला और शबनम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. त्यामुळे त्या चित्रपटात तिला मुख्य नायिकेची भूमिका मिळू शकली नाही. पण, तिला त्या चित्रपटात भूमिका मिळाली. दुसऱ्या दिवशीपासून ती शूटिंगसाठी येऊ शकते असे तिला सांगितले.
पुढे दिव्या भारतीचा एक किस्सा सांगत निर्माते म्हणाले, “सकाळचे शूटिंग रद्द झाले होते, म्हणून मी माझ्या हॉटेल रुममध्ये झोपलो होतो, पण तरीही ती माझ्या खोलीत आली. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिने माझ्या खोलीचे दार उघडले आणि उठ असे म्हणत ती माझ्या छातीवर बसली. त्यावेळी मी आणि माझी पत्नी दोघेही झोपलो होतो. दिव्या आली आणि माझ्या छातीवर बसली. त्यावेळी माझ्या पत्नीने मला विचारले होते, ही मुलगी कोण आहे?”
दरम्यान, ५ एप्रिल १९९३ रोजी संध्याकाळी दिव्या भारती यांचे पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून निधन झाले, त्यावेळी तिचे साजिद नाडियाडवाला यांच्याशी लग्न झाले होते.