Bollywood Actress single at age of 47: ‘राम और श्याम’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘अपने’, ‘शर्माजी की बेटी’, ‘छावा’ आणि अशा अनेक चित्रपटांत विविध धाटणीच्या भूमिका साकारत अभिनेत्री दिव्या दत्ताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
दिव्या दत्ता बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने नेहमीच प्रमुख भूमिका साकारल्या, असे नाही; पण सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेतूनही तिने प्रेक्षकांची मने जिंकली. दिव्या दत्ता उद्या २५ सप्टेंबरला तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का वयाच्या ४७ व्या वर्षीही ही अभिनेत्री अविवाहित आहे. तिने आतापर्यंत लग्न का केले नाही, लग्नाबद्दल तिचे मत काय आहे, यावर अभिनेत्रीने एकदा वक्तव्य केले होते.
“एका वाईट लग्नबंधनात अडकण्यापेक्षा…”
अभिनेत्री म्हणालेली, “जर चांगला जोडीदार मिळाला, तर लग्न करणं योग्य आहे. जर योग्य जोडीदार मिळाला नाही, तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणं महत्त्वाचं आहे. एका वाईट लग्नबंधनात अडकण्यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रित करणं कधीही चांगलं आहे. कुठल्याही नात्यात स्वत:ला कमी महत्त्व देण्यापेक्षा स्वत:वर प्रेम करणं महत्त्वाचं आहे.”
“मला असा जोडीदार..”
“पुरुषांकडून मला अटेंशन मिळते. मी त्याचा आनंद घेते. तुम्ही एकमेकांशी मनानं जोडलेले असाल, तर तुम्ही त्या नात्यात असलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की, समोरची व्यक्ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत साथ देईल, तर तुम्ही लग्न करा. पण, असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर मात्र तुम्ही त्या नात्याबद्दल विचार केला पाहिजे. माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर माझे खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मी स्वत:सामोरी जाते.”
दिव्या असेही म्हणालेली, “मला लग्न करायचं नाही. पण, मला असा जोडीदार हवा आहे, ज्याच्याबरोबर मी प्रवास करू शकेन. जर असा जोडीदार माझ्या आयुष्यात नसला तरीसुद्धा मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.”
दिव्याच्या कामाबाबत बोलायचे तर ‘स्लीपिंग पार्टनर’, ‘धडक’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘छावा’, ‘बदलापूर’, ‘शर्माजी की बेटिया’, ‘वीर झारा’, ‘स्पेशल २६’ , ‘मस्ती एक्सdप्रेस’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या आवाजासाठीदेखील अभिनेत्री ओळखली जाते. आता आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.