Amitabh Bachchan’s Don Movie Director Chandra Barot Passes Away : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते चंद्रा बारोट यांचं आज (२० जुलै) दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशातच आता लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चंद्रा बारोट यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘डॉन’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातूनच चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. यापूर्वी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम केलं होतं. अशातच आता अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमार्फत चंद्रा बारोट यांच्या निधनाने दु:ख झाल्याचं म्हटलं आहे.

अमिताभ यांनी लिहिलं आहे की, “अजून एक दुःखद वार्ता, माझ्या प्रिय मित्राचं आणि ‘डॉन’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आम्ही एकत्र काम केलं होतं. तो माझा फक्त मित्र नाही तर कुटुंबीयांप्रमाणे होता”.

अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता फरहान अख्तरनेही सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, “चंद्रा बारोट यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख होत आहे. ‘डॉन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यात राहिले नाही याचं वाईट वाटतंय. त्यांच्या कुटुंबीयांना देव यातून सावरण्यास शक्ती देवो”.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार चंद्रा बारोट यांच्यावर गुरुनानक रुग्णालयात डॉ. मनीष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. माहितीनुसार, चंद्रा बारोट फुफ्फुसांच्या काही समस्यांमुळे गेल्या ६-७ वर्षांपासून आजारी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’ ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९७८ मध्ये चंद्रा बारोट यांनी ‘डॉन’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. नंतर २००६ फरहान अख्तरने ‘डॉन’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शक केलं. यामध्ये शाहरुख खान प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. आता फरहान या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये रणवीर सिंह व किर्ती सेनॉन झळकणार आहे.