‘३ इडियट्स’, ‘पीके’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’,सारखे चित्रपट देणारे प्रतिभावान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी प्रथमच एकत्र काम करणार आहेत. ‘पठाण’, ‘जवान’सारखे सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर किंग खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘डंकी’चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून यातील शाहरुखचा नवा लुकसुद्धा चर्चेत आहे. चार मित्रांच्या मैत्रीची, प्रेमाची, आपुलकीची व साध्या सरळ लोकांची ही गोष्ट असल्याचं याच्या पहिल्या टीझरमधून स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर शाहरुखचे चाहते या चित्रपटाचा टीझर पाहून चांगलेच उत्सुक झाले आहेत तर काहींनी या टीझरवर टीकाही केली आहे.

आणखी वाचा : Dunki Drop 1: गंभीर विषयाची विनोदी पद्धतीने हाताळणी व किंग खानचा अनोखा अंदाज; बहुचर्चित ‘डंकी’चा टीझर प्रदर्शित

काही लोकांना टीझर खूप आवडला आहे तसेच हृदयस्पर्शी कथा असल्याचं काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर काही लोकांना हा टीझर पाहून ४ वर्षांपूर्वी आलेल्या आणि सुपरफ्लॉप ठरलेल्या शाहरुखच्या ‘झीरो’ या चित्रपटाची आठवण आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘झीरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच आपटला होता आणि यामुळेच शाहरुखच्या करिअरला ४ वर्षांचा ब्रेक बसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘डंकी’मध्ये पुन्हा अशीच झलक काही प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने हा चित्रपटही ‘झीरो’च्या वाटेवरच जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच टीझरमध्ये सोनू निगमच्या आवाजातील एक गाणं आपल्याला ऐकायला मिळत आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी सोनू आणि शाहरुख हे समीकरण जुळून आल्यामुळेही प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. काही लोकांच्या मते ‘डंकी’ हा शाहरुखच्या ‘पठाण’ व ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडत वेगळाच इतिहास रचेल असं स्पष्ट झालं आहे. ‘डंकी’मध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नू, विकी कौशल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.