Esha Deol Post For Bharat Takhtani : बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी यांनी गेल्या वर्षी विभक्त झाल्याची घोषणा केली. दोघे एकमेकांपासून विभक्त झाले असले, तरी त्यांच्या लहान मुलींचा ते एकत्र सांभाळ करीत आहेत. गेल्याच आठवड्यात दोघं भेटले होते आणि त्यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता ईशानं पुन्हा एक्स पतीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

घटस्फोट झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर ईशा देओल एक्स पती भरत तख्तानीसह एकदा एकत्र दिसली होती. भरतनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी फोटो शेअर केला होता. या सेल्फी फोटोत ईशा, तिची बहीण अहाना आणि तिच्या शेजारी त्यांची एक मैत्रीणही दिसली होती. तसंच भरतनं ‘फॅमिली संडे’ अशी कॅप्शन या फोटोला दिली होती. त्यानंतर आता भरतच्या वाढदिवसानिमित्त ईशानं एक्स पती भरतसाठी पोस्ट शेअर केली आहे.

ईशानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भरतचा हसरा फोटो शेअर करत लिहिलंय, “माझ्या बाळांच्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… नेहमी आनंदी, निरोगी राहा. देवाचा तुझ्यावर कायम आशीर्वाद राहो.” या पोस्टसह तिनं काही हसरे इमोजीही शेअर केले आहेत.

घटस्फोटाच्या वर्षभरानं त्यांच्यातील एकत्र येण्याबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आठ दिवसांपूर्वीचा एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता पुन्हा ईशानं भरतचा फोटो शेअर केल्यामुळे दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा होत आहेत.

ईशा देओल इन्स्टाग्राम स्टोरी
ईशा देओल इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ईशा आणि भरतचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. नंतर २०२४ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. दोघांनी गेल्यावर्षी एका निवेदनाद्वारे “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे”, असं म्हणत विभक्त होण्याची घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी, ईशानं भरतबरोबरच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटानंतर मुलांचा एकत्रित सांभाळ करण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तिनं “दोन व्यक्तींमधील नातं पूर्वीसारखं नसेल, दोघे वेगवेगळे राहत असतील, तरीदेखील त्यांना मुलांसाठी एकत्र राहणं गरजेचं असतं आणि हेच आम्ही – मी आणि भरत करीत आहोत” असं म्हटलं होतं.