आपल्या संगीताने आणि गायकिने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए आर रेहमान यांच्या विविध भाषांमधील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप त्यांच्या गाण्यांमधून पाहायला मिळतो. त्यांनी ऑस्कर पुरस्कारवरही स्वतःचे नाव कोरले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव सामील आहे.

रेहमान यांचे लाईव्ह शोज जोरदार सुरू असतात. मध्यंतरी अशाच पुण्याच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान वेळेचं बंधन न पाळल्याने त्यांचा शो मध्येच पोलिसांनी बंद पाडला होता. आता पुन्हा एकदा रेहमान यांचा कॉन्सर्ट काहीशा वादामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच रेहमान यांचा चेन्नईमध्ये ‘Marakkuma Nenjam’ या नावाने एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टच्या ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे बऱ्याच चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “पुढच्या पिढीला…” ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांविषयी नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली नाराजी

रविवारी चेन्नईच्या बाहेरील परिसरात हा कॉन्सर्ट आयोजिय करण्यात आला होता अन् हजारो लोकांनी यासाठी गर्दी केली होती. परंतु अत्यंत वाईट नियोजन केल्याने तिथे चेंगराचेंगरी सारखी दृश्यं पाहायला मिळाली. याबद्दल रेहमानच्या चाहत्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. अपेक्षेपेक्षा जास्त माणसं कॉन्सर्टला हजर होती, बऱ्याच लोकांकडे तिकीट असूनही त्यांना प्रवेश मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

एका चाहत्याने ट्वीट करत लिहिलं, “२००० रुपयांचं तिकीट काढून सुद्धा इतकी बेकार परिस्थिती पाहायला मिळत आहे. अत्यंत ढिसाळ नियोजन आणि कार्यक्रम, आत प्रवेश न मिळताच परत घरी जावे लागले आहे.” बऱ्याच लोकांनी या चेंगराचेंगरी बद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rahman-tweet
फोटो : सोशल मीडिया

नुकतंच ‘ACTC Event’ या कंपनीने याबद्दल खेद व्यक्त करत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये रेहमान आणि त्याच्या चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. याबरोबरच त्यांनी लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. हे ट्वीट खुद्द रेहमान यांनीही शेअर केलं आहे.