Farah Khan Recall Her Bad Experience : बॉलीवूड असो वा मराठी इंडस्ट्री… या क्षेत्रात अनेकांना चांगले-वाईट अनुभव आले आहेत. या क्षेत्रातील स्त्रियांच्या वाटेला तर असे वाईट अनुभव अधिकच आहेत. अभिनेत्रींना तर कास्टिंग काऊचसारख्या घटनांना सामोरं जावं लागलं आहे. असाच काहीसा वाईट अनुभव बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खानलाही आला होता.

फराह खान १५ व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. मात्र, आयुष्यात आलेल्या आर्थिक संकटामुळे तिला संघर्ष करावा लागला होता. वडील कमरान खान यांचा ‘ऐसा भी होता है’ हा चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे घरात खूप आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. पण, या सगळ्या अडचणींवर मात करत फराहने आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने उद्योगात स्वतःचं स्थान निर्माण केलं.

फराह खाननं या क्षेत्रात सुरुवातीला डान्सर म्हणून काम केलं. नंतर ती कोरिओग्राफर बनली आणि पुढे एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून तिनं या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. पण, फराहचा या क्षेत्रातील हा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक महिलांप्रमाणे तिलाही त्रास सहन करावा लागला.

Too Much With Twinkle and Kajol या कार्यक्रमात बोलताना फराहने एक प्रसंग सांगितला, जेव्हा ती एका चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती, तेव्हा दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, “तो दिग्दर्शक माझ्या खोलीत आला आणि त्यानं मला गाण्याबद्दल बोलायचं कारण सांगितलं. मी बेडवर बसले होते आणि तो माझ्या शेजारीच येऊन बसला. मग मला त्याला लाथ मारून बाहेर काढावं लागलं.” त्यावेळी शोमधल्या ट्विंकल खन्नानेही याची पुष्टी करत म्हटलं की, “हो… तो तिच्या मागेच लागला होता. तिला प्रत्यक्ष लाथ मारून त्याला हाकलावं लागलं, हे खरंच घडलं होतं, मी याची साक्षीदार आहे.”

फराह खान इन्स्टाग्राम पोस्ट

तसंच पुढे या कार्यक्रमात बोलताना फराहने तिच्या यूट्यूब चॅनेलबद्दल सांगितले आणि आजही ती रोज काम करते याबद्दलही सांगितलं. याबद्दल फराह म्हणाली, “मला माहीत नाही ही रोज मेहनत करण्याची प्रेरणा कुठून येते, पण मला वाटतं ती एक असुरक्षिततेची भावना आहे. लहानपणी खूप आर्थिक अडचण पाहिली आहे; त्यामुळे आजही वाटतं की मी जर दररोज काम केलं तर माझ्या मुलांसाठी अधिक पैसा साठवता येईल. मुलांसाठी काही तरी करून ठेवावं ही भावनाच मला सतत काम करण्याची ऊर्जा देत असते.”