Farah Khan on late actor Rishi Kapoor: बॉलीवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून फराह खानची ओळख आहे. त्याबरोबरच तिने ‘हॅपी न्यू इअर’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे.
तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला १९९२ ला प्रदर्शित झालेल्या ‘जो जिता वही सिकंदर’, १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘१९४२ : अ लव्ह स्टोरी’, १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटात तिने कोरिओग्राफी केली.
फराह खानने कोरिओग्राफी केलेला आणखी एक चित्रपट, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. शफी इनामदार यांनी दिग्दर्शित केलेला व १९९५ साली प्रदर्शित झालेला हम दोनो या चित्रपटातदेखील तिने काम केले होते. या चित्रपटात नाना पाटेकर, ऋषी कपूर व पूजा भट्ट प्रमुख भूमिकांत होते.
फराह खान विविध कलाकारांच्या घरी जाते. त्याचे एपिसोड यूट्यूबवर पाहायला मिळतात. फराह खानने नुकतीच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरच्या घरी भेट दिली. त्यावेळी तिने रिद्धिमाला ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
फराह खान ऋषी कपूर यांच्याबाबत काय म्हणाली?
फराह खान म्हणाली, “हम दोनो या चित्रपटात चिंटूनं (ऋषी कपूर) नायकाची भूमिका साकारली होती. तो माझ्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. त्यावेळी त्यानं मला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मीसुद्धा त्याला तसाच त्रास दिला.”
“त्याने माझ्या वडिलांबरोबर रफू चक्कर चित्रपटातदेखील काम केले होते. त्यामुळे त्याचं आणि चिंटूचं खूप चांगलं जमायचं.” त्यावर रिद्धीमाने सांगितले की, रफू चक्कर हा तिचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात नीतू कपूरदेखील प्रमुख भूमिकेत होत्या. फराहचे वडील कामरान खान हे १९६०-७० च्या दशकात सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. त्यांनी चित्रपट निर्माता म्हणूनदेखील काम केलं. मात्र, त्यांना फार यश मिळालं नाही. अखेरीस त्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागला.
या यूट्यूब एपिसोडमध्ये हेदेखील पाहायला मिळाले की, रिद्धिमानं वयाच्या ४५ व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात तिच्या करिअरची सुरुवात केल्याबद्दल फराह खाननं तिचं कौतुक केलं. ‘दादी की शादी’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी रिद्धीमानं तिच्या मुलीपासून ४५ दिवस दूर राहून शूटिंग केलं. त्याबद्दल ती म्हणाली की, याआधी मी २०१९ मध्ये कोविडच्या आधी वडील आजारी पडले तेव्हा मी समायराला पहिल्यांदा एकटं सोडलं होतं.
ऋषी कपूर यांना ल्युकेमियाचे निदान झाले. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक वर्षासाठी उपचार घेतले. एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले.
फराह खानने यावेळी रिद्धिमाला ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्यानंतर फोन केला होता, त्या वेळची आठवण सांगितली. ती म्हणाली, “मला आठवते की, जेव्हा मला ही बातमी मिळाली तेव्हा मी चिंटूला फोन केला. मी फोनवर रडत होते; पण तो सकारात्मक होता. तो मला म्हणाला की, मला काही होणार नाही. शांत हो. मी ठीक होईन. या गोष्टी घडत राहतात.”
दरम्यान, फराह खान विविध कार्यक्रमांत सूत्रसंचालनदेखील करताना दिसते.