Farah Khan Talks About Twinkle Khanna : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. आजवर तिनं अनेक कलाकारांना तिच्या चित्रपटांतून ब्रेक दिला आहे आणि आज ते बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. अशातच आता फराहनं स्वत: याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिनं अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबरही काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

फराह खाननं नुकतीच काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी फराह खानसह अनन्या पांडेनंही हजेरी लावलेली. यावेळी तिनं ट्विंकल खन्नानं तिला एकत्र काम करताना रडवलेलं, असं म्हटलं आहे. फराहनं आधी सांगितलं की, माझ्याबरोबर काम करताना जे जे कलाकार रडले आहेत, ते ते कलाकार आज खूप मोठे झाले आहेत.

फराह खानची ट्विंकल खन्नाबद्दल प्रतिक्रिया

फराह या कार्यक्रमात म्हणाली, “माझ्यामुळे ज्या अभिनेत्री रडल्या आहेत, त्या आज मोठ्या सेलिब्रिटी झाल्या आहेत.” अनन्यानंही पुढे ती ‘पती, पत्नी और वो’च्या सेटवर रडली होती याबद्दल सांगितलं. त्यावर ट्विंकल म्हणाली, “तू मलाही रडवलंस; पण मी लोकप्रिय अभिनेत्री झालेच नाही.” फरहा यावर “कारण- तू रडली नाहीस; तू मला रडवलंस” असं म्हणाली. त्यावर ट्विंकल पुढे म्हणाली, “मी तुला रडवलं आणि तू मोठी सेलिब्रिटी झालीस.” यावर फराह, “हो, तू अगदी उलटं केलंस.” असं म्हणाली. त्यानंतर ट्विंकल पुढे गंमत करीत म्हणाली, “आज तुला यूट्यूबवरून मिळत असलेली लोकप्रियता, यश हे सगळं तुला माझ्यामुळे मिळालं आहे.” यावर फराहही, “हो सगळं तुझ्यामुळेच,” असं म्हणाली.

फराहनं पुढे ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटासाठी अनन्या पांडे व भूमी पेडणेकरला डान्स शिकवण्याचा अनुभव सांगितला आहे. ती काजोल व ट्विंकलला याबद्दल सांगत म्हणाली, “मी पती, पत्नी और वो चित्रपटातील एक गाणं केलं होतं, ज्यामध्ये मी अनन्याला रडवलं. म्हणजे मी काजोल आणि ट्विंकल तुम्हा दोघींनाही डान्स शिकवला आहे. तुम्ही दोघीही खूप उत्तम डान्सर होत्या; पण इकडे मला भूमी आणि अनन्याला डान्स शिकवायचा होता आणि मी त्यांना सांगितलं की, तुम्हाला दोघींनाही आयव्ही ड्रिपची गरज आहे.”

अनन्या पांडेने सांगितला फराह खानबरोबर काम करण्याचा अनुभव

अनन्या पुढे फराहबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाली, “मला वाटलं की, मी हिच्यासमोर लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे ती माझ्याशी चांगलं वागेल म्हणून माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास होता; पण सेटवरून निघताना माझ्या डोळ्यांत अश्रू होते.”