हल्ली सोशल मीडियाचा वाढती क्रेझ बघता, बरेचसे कलाकारही सोशल मीडियामार्फत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तर काही कलाकारांनी तर स्वत:ची यूट्यूब चॅनेल्सही सुरू केली आहेत. त्यातलीच एक म्हणजे दिग्दर्शिका फराह खान. फराह खानने २०२४ मध्ये मागच्या वर्षी तिचं फराह खान नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ज्याचे आता दशलक्षांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत.

फराह खान या चॅनेलमार्फत अनेक कलाकारांचे कुकिंगचे व्हिडीओज शेअर करीत असते. यादरम्यान कलाकार स्वत: विविध पदार्थ बनविताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे फराह खान हे सगळं एकट्यानं करत नाही, तर तिचा कूक दिलीप कायम तिच्याबरोबर प्रत्येक व्हिडीओमध्ये असतो. विशेष म्हणजे सर्व कलाकार त्याच्याबरोबर मज्जा-मस्ती करीत असतात; तर दिलीपही अनेकदा विनोद करताना दिसतो. त्याचा साधा, सरळ स्वभाव अनेकांना भावतो. त्यामुळे आता त्याचाही चाहतावर्ग तयार झाला आहे.

एवढेच काय तर दिलीपच्या या शोमधील अनेक रील्स सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता फराह खानचा कूक दिलीप लवकरच शाहरुख खानबरोबर झळकणार आहे. फराह खाननं स्वत: याबद्दल सांगितलं आहे. नुकताच फराह खाननं बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांच्याबरोबर एक एपिसोड शूट केला. या एपिसोडमध्येच फराहनं याबाबत सांगितलं आहे. कबीर खान यांच्याशी गप्पा मारत असताना ती म्हणाली “नुकतीच दिलीपनं शाहरुख खानबरोबर मिंत्रा (Myntra) साठी एक जाहिरात शूट केली आहे.”

त्यामुळे आता लवकरच दिलीप बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानसह जाहिरातीमध्ये झळकणार आहे. दिलीपच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल बोलताना फराहनं शाहरुखचा एक किस्सादेखील सांगितला आहे. ती म्हणाली की, जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी दिलीपबरोबर गेली असताना शाहरुख तिला म्हणाला, “माझे हे दिवस आलेत की, मी तुझ्या कुकबरोबर काम करतोय”. त्यावर ती म्हणाली, “आणि माझे असे दिवस आलेत की, मी तुला सोडून त्याला डिरेक्ट करतेय”.

दरम्यान, फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवर आजवर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. करण जोहर, अभिषेक बच्चन, शेहनाज गिल, कबीर खान, रेमो डिसोझा, गौरव खन्ना यांसारखे अनेक कलाकार या चॅनेलवरील शोमध्ये सहभागी झाले आहेत.