Farhan Khan Talks About Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. अशातच आता अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तरने बिग बींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

फरहान अख्तरने २००४ साली दिग्दर्शन केलेल्या ‘लक्ष्य’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्याबरोबर हृतिक रोशन, प्रीती झिंटा आणि ओम पुरी हे कालाकारही झळकलेले. अशात फरहानने नुकतीच आपकी अदालतमध्ये हजेरी लावलेली. यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

फरहान अख्तरने यावेळी त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कदाचित त्याच्यामुळे बिग बी दुखावले गेले असतील असं म्हटलं आहे. फरहान म्हणाला, “मी हे जाणून बुजून केलं नव्हतं. मला खूप स्पष्टपणे आठवतं की त्यावेळी नेमकं काय झालेलं. त्या दिवशी त्यांचा चित्रपटाच्या शूटिंगसाठीचा पहिलाच दिवस होता आणि आम्ही लष्करी छावणीत शूटिंग करत होतो. तेव्हा मी खूप शिस्तीत काम करण्याचा प्रयत्न करत होतो. लष्करी छावणीत काम करताना सगळी कामं खूप शिस्तबद्ध पद्धतीने करावी लागतात, त्यामुळे आम्हाला तेथील अधिकाऱ्याने सांगितलेलं की आम्ही या ठराविक वेळी येणार, तोवर तुमचं पॅकअप व्हायला हवं.”

फरहान खानने सांगितला बिग बींबरोबर काम करण्याचा अनुभव

फरहान पुढे म्हणाला, “त्यावेळी मी थोडा चिंतेत होतो आणि मला सगळी कामं वेळेत व्हावी असं वाटत होतं, जेणेकरून पुन्हा पु्न्हा गोष्टींसाठी परवानगी घ्यावी लागणार नाही.” अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तो म्हणाला, “त्यांचा पहिलाच दिवस होता आणि ते तयार व्हायला खूप वेळ घेत होते, जेणेकरून त्यांचं काम चांगलं व्हावं आणि माझं असं म्हणणं होतं की इतकं प्रेशर आहे, त्यामुळे मी त्यांना त्यांच्या खोलीत जाऊन विचारतो की त्यांना इथे कुठल्या अडचणींचा सामना करावा लागत आहे का वगैरे. जेणेकरून मी त्यांना काही मदत करू शकेन का? पण मला असं वाटतं, माझं बोलणं त्यांना फार पटलं नसावं. की एक तरुण दिग्दर्शक त्यांना काही अडचण असेल तर सांगा, आपण बोलू असं म्हणतोय; त्यामुळे कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल. मला याची जाणीव नंतर झाली आणि मी त्यांची माफीसुद्धा मागितली. पण, त्यांच्याबरोबर काम करणं खूप सोपं होतं.”

‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात एक महिन्यापूर्वी फरहान अख्तर व जावेद अख्तर यांनी हजेरी लावलेली असताना याबद्दल सांगितलं. बिग बी म्हणालेले, “पहिल्यांदाच मी अशा वातावरणात काम करत होतो, जिथे खूप शांतता होती. आम्ही त्याआधी खूप मस्ती करत करत काम करायचो. पण, इकडे वातावरण खूप वेगळं होतं. मला माझ्या तोंडून संवादही बोलता येत नव्हते. खूप रिटेक घेतले, शेवटी फरहानने पॅक अप करायला सांगितला.”

बिग बी याबद्दल असंही म्हणालेले की, “तो सेटवर असताना माझ्या खोलीत आला आणि मला विचारलं की तुम्हाला काही अडचण तर नाही ना? मला वाटलं की हा मला सांगतोय की चांगला अभिनय कसा करायचा. तेव्हा फरहान खोलीतून गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलेलं. मी भावुक झालेलो. मी जयाला फोन करून सांगितलं की ते मला सांगतायत की कसा अभिनय करायचा. त्यावर ती मला म्हणाली, अमित जी तुम्ही जर आनंदी नसाल तर बॅग भरा आणि निघून या. पण, मला वाटलं की असं केलं तर गोष्टी बिघडतील आणि त्या रात्रीनंतर आम्ही एकमेकांबरोबर खूप मिसळलो होतो आणि छान शूटिंगही झालं.”