गायक, अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर हा जावेद अख्तर व त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘डॉन’, ‘दिल चाहता है’ असे सुपरहिट चित्रपट देणारा फरहान हा महाराष्ट्राचा जावई आहे. फरहानची दुसरी बायको शिबानी दांडेकर हिचे कुटुंब मुळचे पुण्याचे आहे. मराठमोळी शिबानी दांडेकर ही भारतीय-ऑस्ट्रेलियन गायिका, अभिनेत्री, होस्ट आणि मॉडेल आहे.
शिबानी दांडेकर हिची एक बहीण लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, तर दुसरी बहीण गायिका आहे. अभिनेत्री अनुषा दांडेकर ही शिबानीची धाकटी बहीण आहे. तर, गायिका अपेक्षा दांडेकर ही शिबानी व अनुषा यांची बहीण आहे. या तिघी सख्ख्या बहिणी आहेत.
पुण्यातील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या शिबानीचे कुटुंब लंडनला शिफ्ट झाले. शिबानी आधी आफ्रिकेत आणि नंतर ऑस्ट्रेलियात राहिली. ती परदेशात मोठी झाली. अँकरिंगमध्ये करिअर करण्यासाठी शिबानी न्यू यॉर्कला गेली. तिथे तिने नमस्ते अमेरिका, व्ही-देसी आणि द एशियन व्हरायटी शो सारखे शो होस्ट केले. काही वर्षे अमेरिकेत काम केल्यानंतर, शिबानी भारतात परतली. इथे तिने होस्ट व मॉडेल म्हणून अनेक प्रोजेक्ट केले. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात शिबानी को-होस्ट म्हणून दिसली होती.
शिबानी दांडेकरचे करिअर
शिबानीने ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटातील ‘पोली साजुक तुपातली’ आणि ‘संघर्ष’ या चित्रपटात ‘३६ नखरेवाली’ सारखे आयटम नंबर केले आहेत. २०१५ मध्ये आलेल्या ‘रॉय’ या बॉलीवूड चित्रपटात शिबानीने झोयाची भूमिका केली होती. तसेच सलमान खानचा ‘सुल्तान’, शाहिद कपूरचा ‘शानदार’, ‘नूर’, ‘नाम शबाना’ आणि भावेश जोशीचा ‘सुपरहिरो’ या चित्रपटांमध्ये ती छोट्या भूमिकांमध्येही झळकली.
शिबानी दांडेकर-फरहान अख्तरचं आंतरधर्मीय लग्न
आपल्या करिअरपेक्षा शिबानी तिच्या लग्नामुळे जास्त चर्चेत राहिली. मराठमोळ्या शिबानीने फरहान अख्तरशी आंतरधर्मीय लग्न केलं. फरहान व शिबानीची पहिली भेट ‘आय कॅन डू दॅट’ या शोमध्ये झाली. फरहान हा शो होस्ट करत होता. शिबानी या शोचा भाग होती. फरहान अख्तर व अधुना भाबानी यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर फरहान व शिबानी डेट करू लागले. लॉकडाउनमध्ये फरहान व शिबानी लिव्ह इनमध्ये राहिले. काही वर्षे डेट केल्यावर फरहान व शिबानी यांनी २०२२ मध्ये लग्न केलं.