दोनी माजी क्रिकेटपटूंना घेऊन एका दिग्दर्शकाने चित्रपट तयार केला. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि हे दोन्ही क्रिकेटपटू पुन्हा कधीच मोठ्या पडद्यावर दिसले नाही. ‘पल पल दिल के साथ’ असं या चित्रपटाचं नाव. ३० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त १० कोटी रुपये कमावले होते.
निर्मात्यांनी २००९ मध्ये, दोन माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि विनोद कांबळी (Flop Film Of Ajay Jadeja And Vinod Kambli) यांना घेऊन एक चित्रपट बनवला. पण प्रेक्षकांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि तो फ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे या दोघांचंच फिल्मी करिअर नाही तर दिग्दर्शकाचं करिअरही संपलं.
अजय जडेजा यांनी २००३ मध्ये सनी देओल व सुनील शेट्टीबरोबर ‘खेल’ चित्रपट करून पदार्पण केलं होतं. ‘पल पल दिल के साथ’ त्यांचा दुसरा चित्रपट होता. ‘पल पल दिल के साथ’नंतर अजय जडेजा कोणत्याच चित्रपटात झळकले नाही. पण त्यांनी अभिषेक कपूरचा चित्रपट ‘काई पो छे!’ मध्ये कॅमिओ केला होता. ‘पल पल दिल के साथ’ हा विनोद कांबळी यांचाही दुसरा बॉलीवूड चित्रपट होता. त्यांनी २००२ मध्ये सुनील शेट्टी व संजय दत्तच्या ‘अनर्थ’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण ‘पल पल दिल के साथ’ फ्लॉप झाल्यावर विनोद मोठ्या पडद्यावर दिसले नाही.
सिनेमा फ्लॉप झाल्यावर फक्त अभिनेत्रीला मिळालं काम
बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, ‘पल पल दिल के साथ’चे दिग्दर्शक व्हीके कुमार यांचाही हा पहिला व शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर त्यांनी कोणत्याच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही. हा चित्रपट फक्त मुख्य अभिनेत्रीसाठी लकी ठरला. यात माही गिलने मुख्य भूमिका साकारली होती. ‘पल पल दिल के साथ’नंतर माहीने बरेच बॉलीवूड चित्रपट केले. ती अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. चित्रपटांबरोबरच ती वेब सीरिजही करतेय.
चित्रपटाची कथा
‘पल पल दिल के साथ’ या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, यातील एका कोट्याधीश मुलाच्या नेतृत्वातील १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या क्रिकेट टीमची भेट विनोद कांबळीशी होते. तो एक उत्तम क्रिकेटपटू असतो. त्याने एका चित्रपटाची कथा लिहिली असते आणि तो चित्रपटासाठी निर्माते शोधत असतो. टीमचा कोट्याधीश कर्णधार विनोदला वचन देतो की त्याच्या मित्रांना कथा आवडल्यास तो आर्थिक मदत करेल, पण त्यासाठी त्याच्या काही अटी असतात.