बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या पत्नी व कुटुंबाबरोबर मुंबईतील पाली हिल परिसरातील एका घरात राहायला गेला आहे. त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाचे चालू आहे. शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांची मुलं आर्यन, सुहाना व अबराम एप्रिल महिन्यात नव्या घरात शिफ्ट झाले. बँडस्टँड येथील ‘मन्नत’ बंगल्याचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षे लागतील, तेव्हापर्यंत ते याच घरात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आता किंग खानच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल नवीन अपडेट आली आहे. त्यानुसार, गौरी खानने पाली हिल येथील पूजा कासा इमारतीत एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा फ्लॅट त्यांच्या घरापासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे. हा फ्लॅट गौरीने घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. ७२५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा फ्लॅट पाली हिल येथील पंकज सोसायटीमध्ये आहे.
झॅप्कीवरील माहितीनुसार, हा फ्लॅट संजय किशोर रमाणी यांच्याकडून १.३५ लाख रुपये प्रति महिना दराने भाडेतत्वावर घेण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. त्यासाठी ४.५ लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्यात आले आहे. तसेच दरवर्षी भाड्यात पाच टक्के वाढ केली जाईल, असाही करारात उल्लेख आहे.
कोणाच्या मालकीची आहे इमारत?
आधीच्या एका अहवालानुसार, शाहरुख खानने पूजा कासामधील दोन डुप्लेक्स अपार्टमेंट्स दरवर्षी तब्बल २.९ कोटी रुपयांना भाड्याने घेतले होते. या चार मजल्यांचं एका महिन्याचं भाडं २४ लाख रुपये आहे. डुप्लेक्स अपार्टमेंट्सचा कार्पेट एरिया १०,५०० चौरस फूट आहे. पण तरीही तो मन्नतपेक्षा फार कमी आहे. मन्नतचा कार्पेट एरिया २७,००० चौरस फूट आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पूजा कासा ही इमारत अभिनेता जॅकी भगनानी, त्याची बहीण दीपशिखा देशमुख आणि त्यांचे वडील, निर्माते वाशु भगनानी यांच्या मालकीची आहे.
शाहरुख खानच्या प्रतिष्ठित ‘मन्नत’मध्ये आणखी दोन मजले वाढवण्यात येणार आहेत, त्यासाठी नूतनीकरण सुरू आहे. शाहरुख खानने २००१ मध्ये हा बंगला खरेदी केला होता. शाहरुख खानचा हा बंगला चाहत्यांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. याठिकाणी किंग खानची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमत असते.