Genelia Deshmukh : सध्या आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगलं यश मिळत आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिरसह लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकली आहे.
जिनिलीयाचा सहज सुंदर अभिनय, तिची निरागसता या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात. त्यामुळेच अनेक वर्षांनी जिनिलीयाला बॉलीवूड सिनेमात झळकताना पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिनिलीया उत्तम अभिनेत्री आहेच पण, गेल्या काही वर्षांत या देशमुखांच्या सुनेने घराची व मुलांची संगोपनाची जबाबदारी सुद्धा निभावली. दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी मध्यंतरी काही वर्षे तिने बॉलीवूडतून ब्रेक घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडिया रील्स व्हिडीओमुळे जिनिलीया पुन्हा एकदा चर्चेत आली. विशेषत: रितेश-जिनिलीयाच्या मजेशीर व्हिडीओजला चाहते भरभरून प्रतिसाद देऊ लागले. याचदरम्यान, जिनिलीयाच्या आणखी एका गोष्टीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. ती गोष्ट म्हणजे तिचं ट्रान्सफॉर्मेशन! जिनिलीयाने फिटनेससाठी नेमकं काय केलं होतं पाहुयात…
जिनिलीया देशमुखने २०२२ मध्ये अवघ्या ६ आठवड्यांमध्ये ४.३ किलो वजन कमी केलं होतं. जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यासह अभिनेत्रीने तिची वेटलॉस जर्नी देखील चाहत्यांना सांगितली होती.
“६ आठवडे झाले…मी वेटलॉस जर्नीला सुरुवात केली तेव्हा माझं वजन ५९.४ किलो होतं. आता सहा आठवड्यांनी माझं वजन ५५.१ किलो एवढं झालेलं आहे. वजन काहीही करून नियंत्रित करायचं ही गोष्ट जेव्हा मी ठरवली तेव्हा, मला स्वत:वर अजिबात विश्वास नव्हता…मनात शंका होती. पण, आज माझं ध्येय पूर्ण झाल्यावर मनात खूप आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा फिटनेस मला कायम जपायचा आहे…आणि मला कायम लक्षात ठेवायचं आहे की, चीट मिल्सपेक्षा नियमित आहार घेणं कधीही उत्तम! फिटनेस म्हणजे केवळ वजन कमी करणं हा उद्देश नसतो. तर, शरीराची हालचाल होणं, चपळता येणं, स्नायू बळकट करणं हा यामागील मूळ उद्देश आहे. म्हणूनच हा प्रवास असाच सुरू राहणार आहे…” असं जिनिलीयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
जिनिलीयाने ट्रेनिंग सुरू केलं तेव्हा तिचं वजन ५९.४ किलो होतं. यानंतर दुसऱ्या आठवड्यात तिचं वजन ५८.२ किलो झालं. तिसऱ्या आठवड्यात जिनिलीयाचं वजन ५७.२ होतं. अशाप्रकारे सहा आठवड्यांत वर्कआऊट, योग्य डाएट करून जिनिलीयाचं वजन ५५.१ किलो झालं. या सहा आठवड्यांच्या वेटलॉस जर्नीमध्ये अभिनेत्रीने ४.३ किलो वजन कमी केलं.
दरम्यान, जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. अभिनेत्रीने आजवर हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, मराठी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.