Savita Prabhune on Salman Khan: ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी आजवर मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमांमध्ये काम करत त्यांची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या काही भूमिका या प्रचंड गाजल्या.

‘लपंडाव’, ‘कळत-नकळत’, ‘मुंबई पुणे मुंबई’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. पवित्र रिश्ता मालिकेतील त्यांच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली.

सविता प्रभुणे यांनी एका मुलाखतीत सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. सविता प्रभुणे यांनी सलमान खानबरोबर तेरे नाम चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात सचिन खेडेकरदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसले होते.

‘तेरे नाम’ चित्रपटाच्या…

‘तेरे नाम’ चित्रपटात त्यांना कशी भूमिका मिळाली? याबद्दल सविता प्रभुणे म्हणाल्या, “तेरे नाम चित्रपटाचे दिग्दर्शक सतिश कौशिक मला ओळखत होते. ते माझे एनएसडीचे सिनिअर होते. त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं. त्यांनी मला बोलावून घेतलं. ते मला म्हणाले की तुझं डेली सोप वगैरे बाजूला ठेव आणि आधी माझ्या या चित्रपटामध्ये काम कर.”

“मी त्यावेळी कुसुम नावाच्या मालिकेत काम करत होते. त्यावेळी बालाजी टेलिफिल्मने मला खूप सांभाळून घेतलं. मी रोज सकाळी कुसुम मालिकेचे शूटिंग करायचे. त्यानंतर तेरे नाम चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर जायचे.”

सलमान खानबद्दल सविता प्रभुणे म्हणाल्या, “सलमान खानबद्दल खूप चांगल्या आठवणी आहेत. कारण-हे सगळे मुरलेले कलाकार आहेत. स्टारडम फार जवळून बघायला मिळालं. ते जेव्हा सेटवर असतात, तेव्हा ते सगळ्यांशी मिळूनमिसळून वागतात, ते बघायला मिळालं.”

सविता प्रभुणे सध्याच्या मराठी चित्रपटांबद्दल म्हणाल्या…

सध्याच्या मराठी चित्रपटांबद्दल सविता प्रभुणे म्हणाल्या की सध्या मराठीमध्ये खूप सुंदर चित्रपट होत आहेत. मला त्या चित्रपटांमध्ये काम करायला खरंच खूप आवडेल. पण, असं होत आहे की मी टीव्हीवरील मालिकेत काम करते. मालिका म्हणजे मोठं प्रोजेक्ट असतं. सध्या मला मोकळा वेळ मिळतो. महिन्यातले १० दिवस किंवा १५ दिवस मला वेळ असतो, त्यामुळे मी नवीन प्रोजेक्ट नक्कीच करू शकते. मात्र, मध्यंतरी असा काळ होता की मी सलग २०-२५ दिवस मालिकांमध्ये काम करत असायचे. त्यामुळे इतर प्रोजेक्टमध्ये काम करत नव्हते. मी निवडक चित्रपटांमध्ये काम केलं.

दरम्यान, सविता प्रभुणे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत काम करत आहेत.