Govinda Gifts Gold Necklace To Sunita Ahuja On Karwa Chauth : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा त्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दलची माहिती यामार्फत शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आज (१० ऑक्टोबरला) करवा चौथनिमित्त बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल हा सण साजरा करताना दिसत आहेत. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनीसुद्धा हा सण साजरा केल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं.

करवा चौथनिमित्त गोविंदाने पत्नीला दिला सोन्याचा हार

सुनीता यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर करत त्यामधून गोविंदाने त्यांना करवा चौथनिमित्त भेटवस्तू दिल्याचं म्हटलं आहे. सुनीता यांनी यावेळी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर त्यांनी मोठा सोन्याचा हार परिधान केल्याचं दिसतं. या हाराने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोला त्यांनी “सोना कितना सोना हैं, माझं करवा चौथचं गिफ्ट” अशी कॅप्शन दिली आहे. यावेळी त्यांनी गोविंदालाही टॅग केलं आहे.

सुनीता अनेकदा गोविंदा व कुटुंबाबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. अनेकदा त्या त्यांच्या पतीबद्दल स्पष्ट प्रतिक्रियाही देताना दिसतात. मध्यंतरी या दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु, गणेश चतुर्थीला दोघांनी एकत्र उपस्थित राहत या अफवा खोट्या ठरवलेल्या.

सुनीता यांचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल असून त्यांच्या ब्लॉगमधून त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल त्या सांगत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या एका ब्लॉगमधून जेव्हा कधी त्या गोविंदाला दुसऱ्या कोणाबरोबर बघतील तेव्हा त्या स्वत: माध्यमांना याबद्दल सांगतील असं म्हटलेलं.

गोविंदाच्या मॅनेजरने शशी सिन्हाने याबद्दल मागे प्रतक्रिया दिलेली. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार गोविंदाचा मॅनेजर म्हणालेला, “या जगातील कोणतीही व्यक्ती त्या दोघांना वेगळं करू शकत नाही.पूर्वी सुनीता यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली, पण नंतर त्यांच्यातील सगळे प्रश्न सुटले आणि आता त्यांना एकमेकांपासून कुठलीही समस्या नाहीये”, असं म्हटलेलं.