Govinda Talks About Wife Sunita Ahuja : गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ही जोडी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू होती; मात्र दोघांनी एकत्र हजेरी लावत या चर्चा खोट्या ठरवल्या. अशातच आता गोविंदाने त्याच्या पत्नीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा गोविंदाबद्दल प्रतिक्रिया देत असतात. अनेकदा मुलाखतीत त्या त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगत असतात. एका मुलाखतीत त्यांनी गोविंदा आणि त्या एका घरात राहत नाहीत याचाही खुलासा केला होता. तर, अलीकडेच करवा चौथनिमित्त त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत गोविंदानं त्यांना खास भेट दिल्याचंही सांगितलेलं. अशातच आता गोविंदानं काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली.

गोविंदाची पत्नीबद्दल प्रतिक्रिया

गोविंदानं यावेळी त्याच्या पत्नीबद्दल सांगत, ती अनेकदा जे बोलायला नाही पाहिजे तेसुद्धा बोलून जाते, असं सांगितलं आहे. सुनीता यांच्याबद्दल बोलताना गोविंदा म्हणाला, “ती एका लहान मुलासारखी आहे. माझी मुलं तिला ती त्यांचंच मूल आहे अशा पद्धतीनं सांभाळतात. सुनीता लहान बाळ आहे; पण तिनं आमचं घर सांभाळलं आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या. ती एक निरागस मूल आहे. तिचे शब्द कधीच चुकीचे नसतात. फक्त एवढंच आहे की, ती जे नाही बोललं पाहिजे तेसुद्धा बोलते.”

तिनं खूप चुका केल्या आहेत – गोविंदा

गोविंदा पत्नीबद्दल पुढे म्हणाला, की एक वेळ अशी होती जेव्हा तो तिला समजून घेऊ शकला नाही. अभिनेता याबद्दल म्हणाला, “पुरुष घर चालवतात; पण स्त्रिया पूर्ण जग चालवतात.” या कार्यक्रमात गोविंदाला सुनीतानं कधी त्याच्या चुका सांभाळून घेतल्या आहेत का, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “तिनं स्वत:च खूप चुका केल्या आहेत. मी तिला आणि संपूर्ण कुटुंबाला अनेकदा माफ केलं आहे. कधी कधी मला असं वाटतं की, आपण त्यांच्यावर खूप निर्भर असतो. विशेषकरून जेव्हा तुमची आई तुमच्याबरोबर नसते.”

गोविंदा पुढे याबद्दल म्हणाला, “आई नसल्या कारणानं तुम्ही तुमच्या पत्नीवर खूप अवलंबून असता आणि जसजशी वेळ पुढे जात असते, तुमची पत्नी तुम्हाला तुमच्या आईसारखंच ओरडायला लागते. ती आईसारखंच समजावते. त्यांना हे लक्षात येत नाही पण आपण ते पाहत असतो ना. आपण पाहत आलेलो असतो की आता ती किती बदलले आहे आणि पूर्वी जेव्हा तरुण होती तेव्हा कशी होती.”