लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांच्या मैत्रीबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दिग्दर्शक-अभिनेत्याची ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.

डेव्हिड धवन यांच्या २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पार्टनर’ चित्रपटात गोविंदा प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात सलमान खानदेखील प्रमुख भूमिकेत होता. पण, जेव्हा शूटिंगदरम्यान सलमान खानने अचानक सेट सोडला तेव्हा गैरसमज झाले होते. आता अनेक वर्षांनंतर गोविंदाने सलमान खानबरोबर ‘पार्टनर’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला.

“तुमच्या भूमिकेमुळे…”

गोविंदाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने सांगितले की माझ्याबरोबर काम करताना सलमानला असुरक्षित वाटले होते. गोविंदा म्हणाला, “जेव्हा शूटिंग सुरू झाले तेव्हा मी सलमानला म्हणालो की तुझं शूटिंग सुरू झाले आहे. पण, मला माझी भूमिका थोडी विचित्र वाटत आहे. त्यावेळी सलमान म्हणाला, ची ची भैय्या मी असं ऐकलं आहे की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता, त्यांच्या भूमिकांवर तुमच्या भूमिकेचा प्रभाव पडतो, इतर भूमिका दु्य्यम वाटतात. म्हणजे तुमच्या भूमिकेमुळे इतरांच्या भूमिका तितक्या प्रभावीपणे दिसत नाहीत. तर मी असं काय करू, ज्यामुळे माझा प्रभाव कमी होणार नाही.”

“तो दोन महिने…”

“सलमानचे बोलणे ऐकल्यानंतर मी त्याला म्हणालो की, हे बघ, मी आता हिरोसारखा दिसत नाही, माझे वजनही वाढले आहे, त्यामुळे मी पूर्वीसारखा दिसत नाही. तुझ्या हातात काय आहे, तर तू तुझे वेगळे व्यक्तिमत्त्व तयार करू शकतोस, पण तू छान दिसत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे सामान घेतले आणि तो निघून गेला.”

सलमानच्या अचानक सेट सोडून जाण्याच्या निर्णयामुळे डेव्हिड धवन संतापला आणि त्याने लगेच गोविंदाला फोन केला. गोविंदा पुढे म्हणाला, “डेव्हिडने मला फोन केला आणि तो माझ्यावर ओरडला. तो म्हणाला की तू असं काय केलंस? सलमान निघून गेला आहे आणि आता तो म्हणत आहे की तो दोन महिने या चित्रपटावर काम करणार नाही, कारण तो त्याच्या व्यक्तिमत्त्वावर काम करत आहे. चित्रपटाचे शूटिंग रखडले आहे.”

“तू सेटवर राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यावर मी त्याला म्हणालो की मी हे फक्त त्याच्या भल्यासाठीच म्हणालो आहे. मला वाटते की आमच्यापैकी किमान एकाने तरी चांगले दिसले पाहिजे. त्यावर डेव्हिड मला म्हणाला की, तू लिहून दे की सलमानचे डोक्यावरचे केस परत येतील. मी डेव्हिडला म्हणालो की मी ते कसं लिहून देणार?”

अभिनेता म्हणाला, “त्यानंतर ‘पार्टनर’ चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होणार की नाही याबद्दल संभ्रम होता. डेव्हिडने तीन महिन्यानंतर मला फोन केला. तो मला म्हणाला की तू चांगला माणूस आहेस. मी त्याला विचारलं की तुझं माझ्याबद्दलचं मत कसं बदललं? त्यावर डेव्हिडने मला सांगितले की सलमान खूप देखणा दिसत आहे. आम्ही गाण्याचे शूटिंग करत आहोत. तू खूप चांगला आहेस. त्यावर मी त्याला म्हणालो की तुम्ही शूटिंग सुरू केले आणि मला कळवलंदेखील नाही?”

दरम्यान, ‘पार्टनर’ या चित्रपटात गोविंदा आणि सलमान खान यांच्याबरोबरच लारा दत्ता आणि कतरिना कैफ यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. २००७ मधील तो चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. तसेच गोविंदाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.