आलिम हकीम हा भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय हेअर स्टायलिस्टपैकी एक आहे. त्याने रजनीकांत, शाहरुख खान ते रणबीर कपूर आणि हृतिक रोशन यांच्यासह अनेक स्टार्सबरोबर काम केलं आहे. पण आलिम हेअर स्टाईलच्या क्षेत्रात आलेला कुटुंबातील पहिला नाही. त्याचे वडील, हकीम कैरनवी त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध स्टायलिस्ट होते. १९७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक हेअर स्टाईलसाठी ते ओळखले जायचे.

इंडियन एक्सप्रेस स्क्रीनशी बोलताना आलिमने त्याच्या वडिलांच्या व अमिताभ बच्चन यांच्या आठवणी सांगितल्या. “माझ्या बाबांनी बच्चन साहेबांबरोबर त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर काम केलं. ‘सात हिंदुस्तानी’ नंतर बच्चन यांनी जे चित्रपट केले, त्यात ते त्यांचे हेअर स्टायलिस्ट होते. ‘रेश्मा और शेरा’ हा अमितजींचा दुसरा चित्रपट होता. त्यात सुनील दत्त होते. ते माझ्या बाबांचे क्लायंट होते. म्हणून दत्त साहेबांनीच माझ्या बाबांना अमितजींची ओळख करून दिली. तेव्हापासूनच ते एकत्र काम करू लागले. शोले, जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी, दीवार यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हेअरस्टाइल माझ्या वडिलांनी केल्या होत्या,” असं आलिम हकीम म्हणाला.

हकीम कैरनवींना अमिताभ बच्चन यांचे केस कापताना आलेला हार्ट अटॅक

आलिमने त्याच्या वडिलांच्या शेवटच्या क्षणांबद्दलची एक भावनिक आठवण सांगितली. “माझे वडील अमिताभ बच्चन यांचे केस कापताना वारले. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा हेअरकट अमितजींचा होता. ते अमितजींचे केस कापत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. म्हैसूरमध्ये ‘मर्द’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली. अमितजींचा हेअरकट करत असताना त्यांना छातीत दुखू लागलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं,” असं आलिम हकीम म्हणाला.

सुपरस्टार्सबरोबर केलेलं काम

आलिम हकीमचे वडील त्या काळातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम करत होते. “माझे वडील ६० ते ८० च्या दशकातील दिलीप कुमार असो, शत्रुघ्न सिन्हा असो, जितेंद्र असो, या सर्व मोठ्या स्टार्सचे केस कापायचे. फक्त भारतीय कलाकारच नाही तर आंतरराष्ट्रीय स्टारदेखील जेव्हा जेव्हा भारतात यायचे तेव्हा माझ्या वडिलांकडून केस कापून घेण्यास इच्छुक असायचे. मग ते ब्रूस ली असो, रिचर्ड हॅरिस असो, मोहम्मद अली असो किंवा इंग्लंडचा क्रिकेटपटू टोनी ग्रेग असो, या सर्व दिग्गजांनी त्यांचे केस माझ्या वडिलांकडून कापून घेतले होते,” असं आलिम हकीमने नमूद केलं.

फिल्म इंडस्ट्रीत सगळे स्वार्थी

आलिम हकीम अवघ्या ९ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. हकीम कैरनवी यांनी ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदी रशशी बोलताना आलिमने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या कठीण काळाबद्दल सांगितलं. तसेच फिल्म इंडस्ट्रीतून काहीच पाठिंबा मिळाला नाही, त्याबद्दल आलिम व्यक्त झाला होता. “ते सगळे स्वार्थी आहेत, आजही तसेच आहेत. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटतील, प्रेमाने वागतील, पण तुम्हाला स्वतःसाठी काम करावंच लागेल. मला लहानपणी फक्त माझ्या वडिलांचा आदर परत मिळवायचा होता, त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायचा होता,” असं आलिम हकीम म्हणाला होता.

आलिम हकीम सध्या ‘किंग’मध्ये शाहरुख खान, ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर तसेच राजामौलींच्या एका चित्रपटासाठी महेश बाबूचा हेअरस्टायलिस्ट म्हणून काम करतोय.