बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या आहे. यातून नेहमीच त्याने अतुलनीय कामगिरी करत प्रेक्षकांकडून दाद मिळवली आहे, त्यामुळे आता त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्या प्रेक्षकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षाही आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे तर अनेक प्रसिद्ध लोकांचा तो आवडता अभिनेता आहे.
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनंही नुकतेच विकी कौशलबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘इ-टाइम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरभजन सिंग विकी कौशलबद्दल बोलताना म्हणाला, “माझ्या चरित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल योग्य निवड असेल. तो खूप उत्तम अभिनेता आहे.” विकी कौशलच्या अभिनयाने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर खेळाडूंनाही भुरळ घातली आहे. तो अनेकांचा आवडता कलाकार आहे. परंतु, त्यामुळे आता विकी कौशल माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या चरित्रपटात झळकणार का? याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.
गेल्या वर्षभरात विकी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीझोतात आला. याचं कारण म्हणजे त्याचा ‘छावा’ हा चित्रपट. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत त्याने अनेकांच्या मनात जणू कायमचं घर केलं आहे. यातील त्याच्या भूमिकेचं अनेकांकडून कौतुक झालं. विकी साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत असतो, त्यामुळे त्याने केलेलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.
विकी कौशलला नुकतीच बॉलीवूडमध्ये दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. यादरम्यान त्याने विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्याच्या ‘उरी’, ‘सॅम बहादुर, ‘छावा’ या चित्रपटांतील कामाने मात्र प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. आता ‘छावा’च्या यशानंतर विकी दिवंगत चित्रपट दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या चरित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विकीने आजवर काम केलेले चित्रपटांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर लवकरच विकी ‘लव्ह अँड वॉर’, ‘महाअवतार’ या चित्रपटांतून झळकणार आहे, त्यामुळे यापुढेदेखील तो दर्जेदार कलाकृतींमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.