Vishal Malhotra reveals how toilet brand helped him : २००३ मध्ये ‘इश्क विश्क’ सिनेमातून शाहिद कपूर, अमृता राव व विशाल मल्होत्रा लोकप्रिय झाले. शाहिद पुढे एक मोठा स्टार बनला, तर विशाल मल्होत्राने अनेक सिनेमांत मुख्य अभिनेत्याच्या मित्राच्या भूमिका साकारल्या. सारख्याच भूमिका मिळत असल्याने विशालने वेगळ्या भूमिका करायचं ठरवलं. या कारणामुळे त्याला निर्मात्याने चित्रपटातून काढून टाकलं आणि २ वर्षांसाठी इंडस्ट्रीने त्याच्यावर बहिष्कार घातला होता, असं विशालने सांगितलं.
विशाल २५ पेक्षा जास्त वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे, पण त्याने अद्याप स्वतःची कार खरेदी केलेली नाही. ब्रँड बनण्यासाठी एका टॉयलेट कंपनीबरोबर नाव जोडलंय आणि या दोन्हीचा फायदा झाला. यामुळे आर्थिक सुरक्षितता आणि स्वतःचं घर झालं असं विशाल सांगतो.
हिंदी रशशी बोलताना विशाल म्हणाला, “मी वेगळी भूमिका मागितली, ही गोष्ट त्या मोठ्या निर्मात्याने इगोवर घेतली. त्याचे दुष्परिणाम वाईट होते, त्यासाठी मी तयार नव्हतो. माझ्याकडे दोन वर्षे कोणतेही काम नव्हते. त्यानंतर मी खूप घाबरलो होतो.”
विशालने सुरू केला व्यवसाय
या अपयशाने विशालला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला. यानंतर त्याने स्वतःसाठी एक वेगळा मार्ग तयार केला आणि अभिनयाकडे फक्त एक छंद म्हणून पाहायला सुरुवात केली. “त्यानंतर, मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी स्वतः पैसे कमावले आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर झालो, जेणेकरून आयुष्यात असे धक्के बसल्यावर जास्त त्रास होणार नाही,” असं विशाल म्हणाला.
हार्पिकची जाहिरात स्वीकारण्याचं कारण
“त्यांनी मला विचारणा केली तेव्हा मलाही इतरांसारखेच असे विचार आले. ‘हार्पिक हा एक टॉयलेट ब्रँड आहे, याचा माझ्या प्रतिमेवर काय परिणाम होईल?’ पण मी ही जाहिरात स्वीकारण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हार्पिकपर्यंत लोक मला मॅम्बो, वेताळ आणि जॉन म्हणून ओळखत होते, पण हार्पिकनंतर ते मला विशाल म्हणून ओळखू लागले. माझं नाव ब्रँड करण्यासाठी मी ही जाहिरात केली. आज शाहरुख खान त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे,” असं विशाल म्हणाला. “हार्पिकने खूप पैसे दिले, इतके की मी वांद्रेसारख्या ठिकाणी एक छान घर विकत घेतले,” असं विशालने नमूद केलं.
विशालकडे गाडी नाही
“माझ्याकडे अजूनही गाडी नाही. मी टॅक्सीने प्रवास करतो. मुंबईसारख्या शहरात आलिशान गाडी खरेदी करणं हा वेडेपणा आहे. माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल आहे; माझ्या पत्नीकडे गाडी आहे. मी साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो,” असं विशाल म्हणाला.
गाडी न घेण्याचं कारण
लक्झरी कार न घेण्यामागचा विचार विशालने स्पष्ट केला. “तुम्ही लक्झरी कार तेव्हाच खरेदी करावी, जेव्हा त्या कारच्या किमतीच्या दहापट बचत तुमच्या बँकेत असेल. नाहीतर काहीच अर्थ नाही. कोणत्याही कलाकारासाठी आर्थिक बॅकअप असणं खूप महत्वाचं आहे. लोक ग्लॅमरमध्ये हरवून जातात. पण कारचा दरमहा ८० हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल, हाही विचार करा. ही रक्कम लहान नाही, या पैशांची योग्य गुंतवणूक केल्यास फायद्याचं ठरू शकतं,” असं विशालने नमूद केलं.
आई-वडिलांनी दिला गुंतवणुकीचा सल्ला
मानधनाचा पहिला चेक आल्यावर आई-वडिलांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला होता, त्याबद्दल विशाल मल्होत्राने सांगितलं. “मी माझ्या आयुष्यात खूप लवकर पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्यासाठी माझ्या वडिलांचे आभार. मीही माझ्या आईकडे माझा पहिला पगाराचा चेक घेऊन गेलो होतो, तिने मला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ७१५ रुपयांची गुंतवणूक करायला सांगितलं,” असं विशाल म्हणाला. विशालला त्याच्या आई-वडिलांनी गुंतवणुकीचे मूल्य समजावून सांगितलं. “आज तू मला जे काही पैसे देतोय, त्यातून पाच वर्षांत तू घर खरेदी करू शकशील. त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं,” असंही विशालने नमूद केलं.
विशालने सलाम-ए-इश्क, काल आणि किस्मत कनेक्शन सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘डिस्ने अवर’, ‘हिप हिप हुर्रे’ आणि ‘विकी अँड वेताल’मध्ये भूमिका केल्या होत्या. विशालच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने १८ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. नंतर त्याने स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली. विशालचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही आहे. इथे तो चित्रपट, ज्योतिष, पैसा, राजकारण आणि फिटनेस यासह इतर गोष्टींवर चर्चा करतो.