अभिनेता हर्षवर्धन राणेला ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. आता बऱ्याच वर्षांनी तो आणखी एका रोमँटिक चित्रपटातून परतला आहे. या चित्रपटाचं नाव ‘एक दिवाने की दिवानियत’ असं आहे. दिवाळीच्या दिवशी रिलीज झालेला हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये चांगली कामगिरी करतोय आहे. हर्षवर्धनने त्याला रोमँटिक भूमिका करायला का आवडतं, ते सांगितलं.

हर्षवर्धनला रोमँटिक भूमिका करायला आवडतात, याचं कारण त्याचे वडील आहेत. वडिलांना त्यांच्या विविध जोडीदारांबरोबर पाहिलंय, असं हर्षवर्धन सांगतो. “मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळी पाच किंवा सहा जणींबरोबर पाहिलंय. मी त्यांचं प्रेम, कनेक्शन आणि इमोशनल बाँड या गोष्टी पाहिल्या आहेत. मला आठवतं की मी लहान असताना त्यांना बघायचो, पण ते काय करतायत हे मला समजतंय याची जाणीव मी त्यांना होऊ दिली नाही, त्यांना त्यामुळे अस्वस्थ वाटू दिलं नाही,” असं हर्षवर्धन राणे म्हणाला.

सोनम बाजवाबद्दल हर्षवर्धन राणे म्हणाला…

मराठमोळ्या हर्षवर्धन राणेने ‘एक दिवाने की दिवानियत’ मध्ये सोनम बाजवाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. सोनम केवळ एक यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री नाही, तर खूप चांगली कलाकार आहे. ती शांत राहून काम करते, असं हर्षवर्धन म्हणाला.

अभिनेता हर्षवर्धन राणेने २०१६ मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनबरोबर ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ९ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नव्हती, परंतु त्यातील गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता हर्षवर्धन राणेचा ‘एक दिवाने की दिवानियत’ थिएटर्समध्ये धुमाकूळ घालतोय.

‘एक दिवाने की दिवानियत’ हा चित्रपट मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. हर्षवर्धन राणेबरोबर सोनम बाजवा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. शाद रंधावा आणि सचिन खेडकर देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.