Harshvardhan Rane Video : मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अशी कृती करून जातात की, ते यामुळे केवळ रीलच नव्हे; तर रिअल लाईफमध्येही हिरो वाटतात. असंच काहीसं झालं आहे मराठी अभिनेता हर्षवर्धन राणेबाबतीत. हर्षवर्धनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहते त्याचं कौतुक करीत आहेत.

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामुळे हर्षवर्धन राणेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. चित्रपटाला इतके वर्ष होऊनही त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अभिनयासह तो सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो.

सोशल मीडियावर हर्षवर्धन त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. तसंच हर्षवर्धनचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच हर्षवर्धनचा गर्दीतून लहान मुलाला वाचवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा गर्दीत त्याच्या आईपासून हरवल्याचे त्याला कळताच त्यानं त्या मुलाला आपल्या हातात घेतलं आणि स्वत:च्या गाडीत नेऊन बसवलं.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये आईपासून हरवल्यानं तो लहान मुलगा काहीसा घाबरल्यासारखा वाटला. मात्र, हर्षवर्धननं त्याला प्रेमानं शांत केलं आणि स्वत:च्या गाडीत आणलं. व्हिडीओत अनेकजण हर्षवर्धनचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यात मग्न दिसत आहेत. पण, अभिनेत्याचं पूर्ण लक्ष त्या लहान मुलावर होतं. त्याला काही इजा होऊ नये, त्या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून तो काळजी घेताना दिसला.

दरम्यान, या व्हिडीओत हर्षवर्धनच्या आजूबाजूला अगदी चेंगराचेंगरी होईल इतकी गर्दी असल्याचं दिसत आहे. मात्र, या जीवघेण्या गर्दीतून हर्षवर्धनने त्याला सुखरूपरित्या गाडीत आणलं. गाडीजवळ येताच त्या लहान मुलाची आईसुद्धा तिथे आली. हर्षवर्धनच्या या कृतीचं कौतुक झालं आहे.

हर्षवर्धन राणेचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये चाहत्यांनी हाच खरा हिरो, एकच मन किती वेळा जिंकशील; म्हणूनच हर्षवर्धनबद्दल कायम आदर वाटतो. याच्याऐवजी दुसरं कोणी असतं तर त्याने हे अजिबातच केलं नसतं, हिरो नव्हे तर हिरा आहे हा अभिनेता, या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे आणि अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.