बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांची गर्दी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. अनेकदा कलाकार कुठेही गेले की त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर चाहत्यांना काय करावं आणि काय नको असं होतं. असाच एक कलाकार नुकताच परीक्षा द्यायला गेला होता आणि त्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी परीक्षा केंद्रावरच त्याच्याभोवती गर्दी केली. कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता? चला जाणून घेऊ…
हा अभिनेता म्हणजे हर्षवर्धन राणे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. चित्रपटाला इतके वर्ष होऊनही त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अभिनयाबरोबरच तो मानसशास्त्रात शिक्षणही घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभ्यासात मग्न असल्याचे आणि नोट्स काढत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हा अभिनेता वयाच्या ४१ व्या वर्षी आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.
हर्षवर्धन राणे मानसशास्त्रात पदवी घेत आहेत आणि या विषयाची परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेच्या दिवसाचा खास व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला पाहून अनेकांनी विशेषत: मुलींनी गर्दी केली. हर्षवर्धनला पाहिल्यानंतर अनेक मुलींच्या आनंदाला उधाण आलं असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर हर्षवर्धनला पाहिल्यानंतरची उत्सुकताही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
हर्षवर्धन राणे इन्स्टाग्राम पोस्ट
या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन त्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येक चाहत्याला फोटो देत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगी उत्सुकतेने “मला तो खूप आवडतो…” असं म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक मुलींना तो परीक्षा द्यायला आल्याचे पाहून खूपच आनंद होतो. तसंच त्यांना स्वाक्षरीही देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत हर्षवर्धन म्हणतो, “फक्त ३ तास झोप घेतली, सायकॉलॉजिकल रिसर्चची परीक्षा चांगली झाली. ८४ ते ८६% दरम्यान गुण मिळतील अशी आशा आहे.”
हर्षवर्धनने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “हर्ष तुझा खूप अभिमान आहे”, “तू कलाकार असल्याचं उत्तम उदाहरण आहेस”, “मीसुद्धा तुला एक दिवस नक्कीच भेटेन अशी इच्छा आहे”, “तू खूप दयाळू आणि प्रामाणिक आहेस, कायम असाच राहा”, “किती गोड”, “कलाकाराचं त्याच्या चाहत्यावरील हे प्रेम पाहून आनंद झाला” या अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हर्षवर्धनच्या या गोड स्वभावामुळेच त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एकीकडे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना अभिनेता त्याच्या शिक्षणातही तितकंच लक्ष देत आहे, त्यामुळे हा अभिनेता खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, ‘सनम तेरी कसम’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘तारा वर्सेस बिलाल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला हर्षवर्धन हा हिंदी आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये साधे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे.