Bollywood Actor Worked As A Dilivery Boy : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कोणाचाही पाठिंबा नसताना स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. यापैकीच एक म्हणजे अभिनेता हर्षवर्धन राणे. हर्षवर्धन सध्या त्याच्या ‘एक दिवाने की दिवानीयत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का त्याने अभिनयाव्यतिरिक्त एकेकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून आणि कार्पेंटर म्हणूनही काम केलं होतं.

हर्षवर्धन हा बॉलीवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या व अभिनेत्री सोनम बाजवाच्या ‘एक दिवाने की दिवनीयत’ या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धनचा हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असून तो याच दिवशी प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुरानाच्या ‘थामा’लाही टक्कर देताना दिसतोय. हर्षवर्धनच्या या चित्रपटाने आतापर्यंत ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार जवळपास ७१.३५ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर आयुष्मान खारानाच्या थामाने १२६.९५ इतके कोटी कमावले आहेत.

हर्षवर्धनने २०१६ साली ‘सनम तेरी कसम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी त्याने २०१० मध्ये ‘थकिता थकिता’ या तेलुगू चित्रपटात काम केलं होतं. हर्षवर्धनच्या पदार्पणातील चित्रपट ‘सनम तेरी कसम’ हा लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. परंतु, हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आला ते कोविडच्या काळात. तुम्हाला माहीत आहे का, हर्षवर्धन फक्त अभिनेताच नाहीये तर त्याने सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं असून त्याने सुरुवातीला मिळेल ती कामंसुद्धा केली आहेत.

हर्षवर्धन राणेने डिलिव्हरी बॉय म्हणून केलंय काम

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार त्याने डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलंय. त्याच्या संघर्षातील दिवसांमध्ये दोन वेळच्या जेवणासाठी त्याने कार्पेंटर म्हणून, म्हणजेच सुतारकामही केलं आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तो वयाच्या १६ व्या वर्षी त्याच्या घरातून अभिनेता व्हायचं होतं म्हणून पळाला होता. शरद केळकरला पाहून त्याला अभिनयासाठी प्रेरणा मिळाली. हे दोघेही मुळचे ग्वाल्हेर मध्य प्रदेशचे आहेत.

हर्षवर्धन घरातून पळून आला तेव्हा त्याच्याकडे फक्त २०० रुपये होते. ग्वाल्हेरहून तो दिल्लीला गेला होता. तिथे त्याने वेटर म्हणून काम केलं, ज्याचे त्याला दिवसाला १० रुपये मिळायचे आणि छोले व भात खायला मिळायचा. त्याने एसटीडी बूथमध्ये, सायबर कॅफेमध्येही काम केलं; तो डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करायचा.

हर्षवर्धनने इंग्रजी शिकण्यासाठी कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केलेली. ‘फ्री प्रेस जरनल’शी संवाद साधताना त्याने सांगितलं की, “त्यावेळी लोक सांगायचे की इंग्रजी शिकणं म्हत्त्वाचं आहे, त्यामुळे इंग्रजी शिकणं माझं ध्येय झालं होतं. मी कोचिंग क्लासेस शोधायचो, पण माझ्याकडे त्यासाठी पुरेसे पैसे नसायचे; त्यामुळे मी कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी मला संवाद कसा साधायचा, इंग्रजी कशी बोलायची हे शिकवलं.”

हर्षवर्धनने ‘झुम’शी संवाद साधताना सांगितलं की, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना त्याने एकदा जॉन अब्राहमला त्याचं हेल्मेट डिलिवर केलं होतं, त्यावेळी तो दिल्लीत एका कार्यक्रमानिमित्त आला होता. त्याने पुढे त्याच्या तेलुगू इंडस्ट्रीतील कामाबद्दलही सांगितलं. हर्षवर्धनने तेलुगूमध्ये काम करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली होती. नंतर त्याने तेलुगू चित्रपटांत काम केलं, पण तिकडे त्याला फक्त खलनायकाच्या भूमिकांसाठी विचारणा होत असल्याने त्याने योग्य भूमिकेची वाट पाहण्याचं ठरवलं आणि तोवर कार्पेंटर म्हणून काम केलं.

हर्षवर्धन याबद्दल म्हणाला, “मला नकारात्मक भूमिका करायच्या नव्हत्या म्हणून मी ब्रेक घेतला, पण त्या तीन वर्षांत मी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होतो म्हणून मी कार्पेंटर म्हणून काम केलं. माझे बाबाही तेच काम करायचे. मी लहान असताना त्यांना हे काम करताना पाहायचो, त्यामुळे पार्ट टाईम जॉब म्हणून हे काम केलं.” हर्षवर्धनने पुढे त्याच्या शिक्षणाबद्दलही सांगितलं आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार तो म्हणाला, “मी शिक्षण पूर्ण केलं नाही याची मला खंत होती, म्हणून मी अभिनेता झाल्यानंतरही काही वर्षांनंतर शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.”

हर्षवर्धनने आजवर ‘एक दिवाने की दिवानीयत’, ‘सावी’, ‘तारा वर्सेस बिलाल’, ‘द मिरांडा ब्रदर’, ‘माया’, ‘सनम तेरी कसम’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. सध्या तो त्याच्या ‘एक दिवाने की दिवानीयत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.