Hema Malini Once Praises Step Son Sunny Deol : हेमा मालिनी व धर्मेंद्र बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. परंतु, हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं एक लग्न झालेलं आणि त्यांना ४ मुलंही होती. त्या काळी या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल अनेकदा चर्चा केली जायची; तर धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर हेमा मालिनींसमोर काही आव्हानं येऊ शकतात असं म्हटलं जात होतं.हेम

हेमा मालिनी यांचं धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्या पहिल्यांदा सनी देओलबरोबर कधी बोलल्या होत्या याबद्दल सांगितलेलं. धर्मेद्र यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर जवळपास दहा वर्षांनंतर त्यांच्यामध्ये व सनी देओलमध्ये पहिल्यांदा संवाद झालेला. त्यावेळी अभिनेत्री डिंपल कपाडिया ज्या हेमा मालिनी यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या आणि सनी देओललाही जवळून ओळखत होत्या, त्या हेमा व सनी यांच्यामधील दुवा झाल्या.

हेमा मालिनी जेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शिका म्हणून काम करत होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या ‘दिल आशना हैं’ चित्रपटात डिंपल कपाडिया यांची महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी निवड केलेली. यामध्ये शाहरुख खान व दिव्या भारती मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात एक सीन होता, जो डिंपल यांच्यासाठी थोडा अव्हानात्मक होता, त्यामुळे त्यांनी सेटवर सनी देओलला बोलवून घेतलं होतं. त्यावेळी सनी देओलने येऊन डिंपल यांच्या सुरक्षेबद्दल हेमा यांच्याकडे चौकशी केलेली.

हेमा मालिनींची सनी देओलबद्दल प्रतिक्रिया

हेमा यांनी याबद्दल त्यांच्या राम कमल मुखर्जींनी लिहिलेल्या ‘हेमा मालिनी: बियोंड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात सांगितलं आहे. यामधून त्या म्हणालेल्या की, “‘मला दिल आशना हैं’साठी मिथुन यांच्याबरोबर पॅराग्लाईडिंगचा सीन शूट करायचा होता आणि तेव्हा तिथे एका गाण्यासाठी विमानाचा एक सीन करायचा होता. शूटिंगच्या काही दिवसांपूर्वी पायलटचा अपघात झालेला. डिंपल ते शूटिंग करण्यासाठी खूप घाबरलेली. तिने काळजीपोटी सनीला याबद्दल सांगितलं. सनी तिथे आला आणि मला भेटला आणि ती सुरक्षित आहे का याबद्दल चौकशी केली आणि तेव्हापासून मी त्याच्याशी बोलायला लागले.”

हेमा मालिनींनी सावत्र मुलाचं केलेलं कौतुक

२०१७ मध्ये या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान, हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या मुलांबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलेलं. त्यावेळी त्या म्हणालेल्या की, “२०१५ मध्ये माझा अपघात झाला तेव्हा माझी चौकशी करण्यासाठी घरी आलेला पहिला माणूस सनी होता. त्याने माझ्या ट्रीटमेंटसाठी योग्य डॉक्टर बोलावले आहेत की नाही याची चौकशी केली. सनी कायम धरमजींबरोबर माझ्या मदतीसाठी असतो.”