‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट आणि त्यासंबंधीत अनेक नवनवीन चर्चा या काही थांबायच्या नावच घेत नाहीत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेक चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. मात्र काही दिवसांनी बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातू एक्झिटची घोषणा केली आणि चाहत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. परेश रावल यांच्या एक्झिटच्या घोषणेनंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ कंपनीद्वारे त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आले.
अशातच परेश रावल यांनी आज रविवारी (२५ मे) एक नवीन ट्विट केले. परेश यांनी शेअर केलेल्या या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे, “माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील.” त्यानंतर आता ‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल यांच्या एक्झिटवर त्यांची कायदेशीर टीमने अखेर मौन सोडले आहे. याबद्दल अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या सूत्रांनुसार, मार्चमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, अक्षय कुमारने परेश रावल यांना ‘हेरा फेरी ३’मध्ये साइन करण्यासाठी एक कागदपत्र दिले आणि सांगितले की, संपूर्ण करार नंतर करण्यात येईल. परंतू, परेश यांना खात्री नव्हती. कारण त्यांनी कोणतीही स्क्रिप्ट किंवा इतर तपशील पाहिले नव्हते. यावर अक्षय त्यांना म्हणाला, “काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते सगळं नंतरच्या करारात मिळेल”.
अक्षय कुमारशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे परेश रावल यांनी करारावर स्वाक्षरी केली. पुढे टीमकडून असे सांगण्यात आले, की साजिद नाडियाडवालाचे चुलत भाऊ आणि मूळ ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी परेश रावल यांना नोटीस पाठवली होती. ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीवर चिंता व्यक्त झाली होती. त्यामुळे परेश यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि करार रद्द करून व्याजासह पैसेही परत केले.
‘हेरा फेरी ३’मधील तीन प्रमुख कलाकारांपैकी एक आणि निर्माता अक्षय कुमारकडून परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली गेली. अक्षयच्या टीमने असा दावा केला की, परेश रावल यांच्या चित्रपटातून अचानक बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे कलाकार, इतर टीम आणि ट्रेलरच्या शूटिंगचं आर्थिक नुकसान झालं.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी परेश यांचं एकूण मानधन १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं. त्यापैकी परेश यांनी त्यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये हे व्याजासह परत केले. दरम्यान, ‘हेरा फेरी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर झालं, तेव्हापासूनच चाहते मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, आता बाबू भैय्या चित्रपटात नसणार हे कळताच चाहते नाराज आहेत.