ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.
तर दुसरीकडे एका हिंदू संघटनेने ‘आदिपुरुष’बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे ‘रामायण’, ‘भगवान श्रीराम’ आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’मध्ये रावण बनलेल्या सैफ अली खानची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मुघलांचा उल्लेख करत म्हणाले…
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत संघटनेने चित्रपटावर अनेक आरोप केले आहेत. या चित्रपटात ‘रामायण’, ‘भगवान श्रीराम’ आणि हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. याशिवाय हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या याचिकेत ‘आदिपुरुष’मधील रावण, भगवान श्रीराम, माता सीता आणि हनुमान यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणीही दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. हे दृश्य रामायणातील धार्मिक पात्रांच्या चित्रणाच्या विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
sacnilk च्या अहवालानुसार, ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या सुमारे १० लाख तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते. या आकडेवारीनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, चित्रपट पाहणाऱ्या काही प्रेक्षकांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्स बालिश स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे.
रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीतामातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत आहेत.