डबू मलिक हे संगीतकार म्हणून लोकप्रिय झाले. आता ते गायक अमाल मलिक आणि अरमान मलिक यांचे वडील म्हणून ओळखले जातात. एक काळ असा होता, जेव्हा त्यांना अभिनेता व्हायचे होते.

करिअरच्या अगदी सुरुवातीला, संगीत क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण होण्यापूर्वी त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी त्यांचे भाऊ लोकप्रिय गायक व संगीतकार अनु मलिक यांच्यावर आधारित एक गोष्ट लिहिली होती.

डबू मलिक काय म्हणाले?

डबू मलिक यांनी त्यांच्या यूट्यूब व्लॉगमध्ये त्याबद्दल खुलासा केला. त्यांनी ती स्क्रिप्ट जया बच्चन यांना दाखविली. जया बच्चन यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल प्रॉडक्शन हाऊसकडून, त्या स्क्रिप्टवर चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरले.

डबू मलिक म्हणाले, “माझ्या आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा मी स्वतःच्या हातांनी ‘गायक’ ही पटकथा लिहिली. ती कथा मला स्वत:लाच सांगायची होती. तो चित्रपट माझे वडील आणि माझा भाऊ अनु मलिक यांच्या जीवनप्रवासावर आधारित होता. ती एका वडील आणि मुलाची कथा होती, जी मी जवळून पाहिली होती. मी ‘एबीसीएल’समोर पटकथा सादर केली. जयाजींना ती आवडली. कंपनीकडून चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आणि आम्ही जवळजवळ ७०-८०% शूटिंग केले.”

पुढे डबू मलिक म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली होती. त्यामुळे ‘एबीसीएल’ कोसळली आणि त्याबरोबरच ‘गायक’ चित्रपटाचे शूटिंगही थांबले. मी ते सहन करू शकलो नाही. मला दोन मुलांचा विचार करायचा होता. त्यांचे भविष्य सुरक्षित करायचे होते आणि विचित्र गोष्ट म्हणजे इतक्या यशस्वी कुटुंबातून आलो असूनही माझ्याकडे काहीही नव्हते. मी एका प्रसिद्ध व यशस्वी संगीतकाराचा भाऊ होतो; पण माझ्या मुलांसाठी घरी काहीही नव्हते.”

“त्या कठीण काळात ज्या व्यक्तीनं मला सर्वांत जास्त पाठिंबा दिला तो राजू श्रीवास्तव होता. तो मला म्हणाला की, मी तुला घर खरेदी करण्यास मदत करीन. कधीही काहीही कमी पडू नये याची मी काळजी घेईन.”

डबू मलिक यांनी राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या कठीण काळात मदत केली होती. त्याची आठवण सांगत ते म्हणाले, “सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी राजू त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करत होता. एक वेळ अशी आली की, त्यानं हार पत्करली आणि मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. तो माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की, मला थोडे पैसे द्या. मी गावी परत जाणार आहे. मला वाटत नाही की, इथे माझे काही होईल. मी त्याला मिठी मारली आणि म्हणालो, माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते घे आणि दर महिन्याला मी तुला जास्त पैसे पाठवीन; पण शहर सोडू नकोस. काही वर्षांचा काळ गेल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली.”

डबू मलिक यांनी कठीण काळात केलेल्या मदतीची जाणीव राजू श्रीवास्तव यांनी ठेवली होती. नवीन घर घेतल्यानंतर डबू मलिक यांनी संगीत क्षेत्रात एक नवीन सुरुवात केली.