बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन ही चित्रपट निर्माती आहे. हृतिक रोशनची मोठी बहीण सुनैना रोशन हिने अभिनेत्याबरोबर झालेल्या भांडणाबद्दल सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये तिने भावाबरोबर तिचं भांडण का झालं होतं याबद्दल सांगितलं आहे.सुनैना रोशनने ‘गलाटा इंडिया’ला मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने ती दारुच्या आहारी गेली होती व त्यामधून बाहेर येण्यासाठी तिला कसा संघर्ष करावा लागला, तसेच यादरम्यान तिचं हृतिक रोशनशी झालेल्या भांडणाबद्दल तिने सांगितलं आहे.

सुनैना म्हणाली, तिला दारूचं व्यसन जडल्याने यामधून बाहेर येणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं. ती व्यसनाधीन झाली असल्याने दारू पिण्याची सवय मोडावी याकरिता ती परदेशात कोर्स करण्यासाठी गेली होती. याबाबत बोलताना ती म्हणाली, “तो कोर्स खूप जास्त कठीण होता.२८ दिवसांचा कोर्स होता, परंतु मला १० व्या दिवशीच पुन्हा घरी जाण्याची ईच्छा झाली. पण, माझ्या भावाने मला कोर्स अर्धवट सोडून परत यायचं नाही अशी सक्ती केली होती. तो म्हणाला, तू कोर्स पूर्ण केल्याशिवाय परत यायचं नाही.”

सुनैना पुढे म्हणाली, “त्याने मला परत येण्याची परवानगी दिली नाही. तो म्हणाला, कोर्स पूर्ण झाल्याशिवाय तू इकडे यायचं नाही, असं केलंस तरच तू दारूच्या व्यसनापासून मुक्त होशील. हृतिक याबाबत प्रचंड गंभीर होता. इतका की, आमच्या वडिलांना कर्करोगाचं निदान झालं आहे हे सुद्धा मला परतल्यानंतर समजलं; त्याने मला याबद्दल सांगितलं नव्हतं आणि मी त्या कोर्ससाठी जिथे गेले होते तिथे फोन वापरण्याची परवानगी नव्हती. कारण या काळात कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही किंवा ताण घ्यायचा नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.”

सुनैना परत आल्यानंतर राकेश रोशन यांनीच तिला त्यांना कर्करोगाचं निदान झाल्याचं सांगितलं. ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत बोलताना ती म्हणाली, “मी हे ऐकून स्तब्ध झाले होते. आता बोलतानाही मला तो क्षण आठवत आहे.” पुढे ती म्हणाली, “मला तिकडून पुन्हा घरी यायचं होतं, यासाठी माझं हृतिकबरोबर भांडणही झालं, मी त्याला खूप ओरडले होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दारूच्या व्यसनाबद्दल बोलताना सुनैना म्हणाली, “मला दारूचं व्यसन जडलं होतं. एका दिवसात मी सहा बिअरच्या बॉटल्स संपवत असे. पण, जेव्हा एक दिवस मला जाणवलं की, मी काल काय केलं होतं हे मला आज आठवत नाहीये, जे खूप भयानक होतं. कारण सकाळी मी सगळं विसरलेली असायचे. माझ्याबद्दलची ही एकच अशी गोष्ट आहे, जी मला अजिबात आवडत नाही.”