Ismail Darbar on Gauahar Khan: संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांनी नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांची सून गौहर खानबाबत वक्तव्य केले. अभिनेत्री एक उत्तम आई असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, लग्न झाल्यानंतर आणि आई झाल्यानंतर तिने काम करत राहावे, या मताचा मी नाही असेही ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी त्यांची दुसरी पत्नी आयेशा यांचे उदाहरण दिले.
कुटुंबासाठी तिने तिचे करिअर सोडले. आता मी गौहरने काय करावे, हे सांगण्याचा मला अधिकार नाही, पण तिचा नवरा झैद हे करू शकतो. तसेच त्यांनी हेही कबूल केले की मी जुन्या पद्धतीच्या कुटुंबातील आहे.
या मुलाखतीत इस्माइल दरबार यांना जेव्हा गौहर खानबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, “मला फक्त एवढेच माहिती आहे की तिचे झैदशी एक उत्तम नाते आहे आणि ती एक उत्तम आई आहे.”
“गौहर आता आमच्या कुटुंबातील…”
ते पुढे म्हणाले, ” माझी पत्नी आयशाने केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या मुलासाठी काम करणे थांबवणे. त्यावेळी ती शोमधून महिन्याला ५ लाख रुपये कमवत होती आणि तिला अभिनयाच्या ऑफरही येत होत्या, पण तिने कधीही सांगितले नाही की तिला गाणे गायचे आहे किंवा अभिनयात काम करायचे आहे. इतकेच नाही, जेव्हा मला पैशांची गरज होती तेव्हाही तिने कधीही मी पैसे कमावते असे म्हणाली नाही.”
इस्माइल दरबार यांना विचारले की, तुम्ही तुमच्या सुनेचे म्हणजेच गौहर खानचे काम पाहता का? यावर ते म्हणाले, “मी रुढीवादी कुटुंबातील जुन्या विचारांचा आहे. जेव्हा चित्रपटात काही रोमँटिक सीन दाखवले जातात, तेव्हा ते बघण्याचे आम्ही टाळतो. आजही आमच्या घरात हे होते.
“गौहर आता आमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे. तिच्या मान-सन्मानाची, प्रतिष्ठेची जबाबदारी आमची आहे. पण, तू आता काम करू नकोस, असे मी तिला सांगू शकत नाही; तो झैदचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा अधिकार आहे. ज्या गोष्टींचा मला त्रास होईल, अशा गोष्टीत मी गुंतत नाही. मला माहीत आहे, जेव्हा मी तिचे काम पाहीन, तेव्हा मी ते सहन करू शकणार नाही. जर तसे झाले तर मी त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारेन.”
गौहर खान आणि झैद दरबारबद्दल बोलायचे तर त्यांनी २०२० ला लग्नगाठ बांधली. त्यावेळी झैद २० वर्षांचा होता. २०२३ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. यावर्षी त्यांना दुसरा मुलगा झाला आहे.
गौहर खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने रॉकेट सिंग, इश्कजादे, बद्रीनाथ की दुल्हनियाँ, बेगम जान, गेम अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बिग बॉसच्या ७ व्या पर्वाची विजेतीदेखील आहे.