Jackie Chan Expresses Desire To Work In Bollywood: ‘कराटे किड लेजेंड्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे अजय देवगणचा मुलगा युग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील पात्राला त्याचा आवाज देणार आहे. या चित्रपटात अजय देवगणने जॅकी चॅन यांच्या पात्राला आवाज दिला आहे.
मी तुमचा खूप मोठा चाहता…
आता अभिनेता अजय देवगण व जॅकी चॅनचा एक व्हिडीओ निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. ‘सोनी पिक्चर्स इंडिया’ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकी चॅन व अजय देवगण यांच्यात संवाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजय देवगण जॅकी चानला म्हणतो की मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. त्यानंतर मला भारतात येण्यासाठी आमंत्रित कर, असे म्हणत जॅकी चॅन यांनी अजयबरोबर बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की अजय देवगण जॅकी चॅनला म्हणतो की तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. जॅकी अजय देवगणला असेही म्हणाताना दिसत आहेत की तू अॅक्शन सीन कर मी डान्स करतो. तसेच जॅकी चॅन ‘कुंग फू योगा’ चित्रपटातील डान्स स्टेप्स करून दाखवताना दिसत आहे. या चित्रपटात दिशा पटानी, सोनू सूद हे कलाकारदेखील दिसले होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी दोन्ही कलाकारांचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले, “दोघांना एकत्र पाहण्याची वाट पाहत आहे”, दुसर्या एका चाहत्याने लिहिले, “दोन दिग्गजांना एकत्र पाहणे आनंदाचे असणार आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह”, एका नेटकऱ्याने लिहिले, “या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहे.”



अजय देवगण आणि त्याचा मुलगा युग हे दोघेही ‘कराटे किड: लेजेंड्स’ या चित्रपटातील पात्रांना आवाज देणार आहेत. अजय जॅकी चॅन यांनी साकारलेल्या मिस्टर हान या पात्राला आवाज देणार असून तर युगने बेन वांग यांनी साकारलेल्या चित्रपटातील मुख्य पात्र ली फोंगला आवाज देईल. युग या चित्रपटाला आवाज देत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी अजयदेखील पहिल्यांदाच व्हॉइसओव्हर करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटासंबंधी एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजय देवगणने त्याच्या लेकासह हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान युगला ‘सिंघम’मधील एक डायलॉग ऐकवण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी युगच्या उत्तराने सर्वजण खूश झाल्याचे दिसले. तो म्हणाला की मित्रा, एका दिवसातच मला सिंघम बनवशील का? कोणीही कोणालाही ‘सिंघम’ बनवू शकत नाही.
जोनाथन एंटविस्टल दिग्दर्शित ‘कराटे किड : लेजेंड्स’ हा २०२५ मध्ये प्रदर्शित होणारा एक अमेरिकन मार्शल आर्ट्स चित्रपट आहे. १९८४ मध्ये सुरू झालेल्या कराटे किड फ्रँचायजीमधील हा ६ वा चित्रपट आहे. त्यात जॅकी चॅन, बेन वांग, राल्फ मॅचियो, जोशुआ जॅक्सन, सॅडी स्टॅनली आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. हा चित्रपट ३० मे रोजी अमेरिका, भारत व कॅनडामध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये पाहता येणार आहे.