बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आहे ते तिच्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामुळे. ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट येत्या ६ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यासह या चित्रपटातील ‘दिल-ए-नादान’ हे गाणंदेखील प्रदर्शित झालं आहे. गाण्याला व ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसतो.

अशातच नुकतंच जॅकलिन फर्नांडिसने ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला मुलाखत दिली आहे. तिने तिच्या करिअरबद्दल तसेच तिच्या आईबद्दल यामध्ये सांगितलं आहे. ती म्हणाली, “आज मी जे काही आहे ते माझ्या कामामुळे. मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये महिलांना पाठिंबा देण्याची गरज आहे, जेणेकरून त्या अजून चांगल्या पद्धतीने स्वत:चं काम करू शकतील.” यासह तिला ”नुकतंच एका महिन्यापूर्वी तुझ्या आईचं निधन झालं, हा काळ खूप कठीण असतो याबद्दल तू काय सांगशील” असा प्रश्न विचारण्यात आला.

‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मी स्वत:ला भाग्यवान समजते की तिच्याबरोबर मला शेवटचे काही महिने घालवता आले. पण, त्यामधून बाहेर येणं इतकं सोपं नाही, खूप वेळ लागतो. मी अजूनही यामधून बाहेर आलेली नाहीये. पण मी असा विचार करते की तिला कायम मी खूप मोठं व्हावं, स्वप्न पाहत राहावी, ती पूर्ण करावी असं वाटायचं आणि तिने आजवर मला खूप पाठिंबा दिला आहे.”

आईबद्दल बोलताना पुढे जॅकलिन म्हणाली, “मी खूप साध्या, सरळ, घरातून आलेली मुलगी आहे, त्यामुळे जेव्हा मी अभिनेत्री व्हायचं आहे हे ठरवलं तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना हे सांगताना घाबरायचे; पण नंतर मी ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी कायम मला यासाठी पाठिंबा दिला. माझ्या आईने तर खूप पाठिंबा दिला.”

दरम्यान, जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बालायचं झालं तर ती लवकरच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटात झळकणार आहे. यासह ती नुकतीच सोनू सुदच्या ‘फतेह’ या चित्रपटात झळकली होती, तर अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘रेड २’ मध्येही ती पाहायला मिळाली होती. तर बॉलीवूडसह जॅकलिनने नुकतंच गेल्यावर्षी हॉलीवूडमध्येही पदार्पण केलं आहे.