Shah Rukh Khan’s King Movie : लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण, रानी मुखर्जी, अनिल कपूर, सुहाना खान ही मंडळी झळकणार आहेत. अशातच आता या चित्रपटात अजून एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. चित्रपट, वेब सीरिजमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता पुन्हा एकदा किंग खानसह काम करणार असल्याचे त्याने स्वत: एका मुलाखतीमधून सांगितले आहे.

शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘किंग’ चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. त्यांच्यासह आता प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावतही ‘किंग’ चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्याने स्वत: याबद्दल ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमधून माहिती दिली आहे. ‘महाराज’फेम अभिनेता म्हणाला, “माझ्या माहितीनुसार शाहरुख खान सर खूप दिवसांपासून याबाबत विचार करीत होते. पण, सिद्धार्थ सरांना (किंग चित्रपटाचे दिग्दर्शक) या बाबतीत थोडी शंका होती. कारण- ‘किंग’मध्ये माझी भूमिका छोटी आहे”.

जयदीप अहलावत पुढे म्हणाला, ” ‘ज्वेल थीफ’नंतर मला या भूमिकेसाठी विचारणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. पण, शाहरुख सर त्यांना म्हणाले की, मी त्याच्याशी बोलतो. त्यामुळे आता खान साहेबांचं बोलणं कोण टाळू शकतं”. शाहरुख खानबद्दल बोलताना जयदीप पुढे म्हणाला, “मला ते खूप आवडतात. मी आजवर त्यांना ५-७ वेळा भेटलो आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. ‘रईस’मध्ये मी चार ते पाच दिवस त्यांच्यासह काम केलं आहे आणि त्यानंतरही आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते माझ्याशी कायम खूप छान वागले आहेत”.

जयदीप अहलावत शेवटचं ‘ज्वेल थीफ’मध्ये झळकला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, जयदीप अहलावत, निकिता दत्ता, कुणाल कपूर हे कलाकार झळकले होते. २५ एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये जयदीप अहलावतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जयदीप अहलावत यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या मुलाची जुनैद खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘महाराज’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपटसुद्धा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याने खलनायकाची महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री शर्वरी वाघ, वैभवी मर्चंट हे कलाकारही झळकले होते. नुकतीच २१ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.