Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Anupam Kher Reaction : जम्मू-काश्मीर मधल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. या हल्ल्यात २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या हल्ल्याचा राजकीय वर्तुळासह सिनेविश्वातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

मराठीसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. करण जोहर, विकी कौशल, अक्षय कुमार यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. तसेच अनुपम खेर यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडून महत्त्वपूर्ण विनंती केली आहे ते व्हिडीओमध्ये काय म्हणालेत पाहुयात…

अनुपम खेर म्हणाले, “काश्मीरमध्ये आज जो काही नरसंहार झालाय, त्यात २७ हिंदूंना लक्ष्य केलं गेलं. ही घटना ऐकून मला प्रचंड वेदना झाल्या. पण, याचबरोबरीने मनात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आयुष्यात या सगळ्या गोष्टी मी बऱ्याचदा पाहिल्या आहेत. काश्मीरमधील हिंदू नागरिकांबरोबर या गोष्टी घडताना मी यापूर्वीही पाहिल्या आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात तेच सगळं वास्तव दाखवण्यात आलं होतं. ज्याला अनेक लोकांनी हा सिनेमा प्रपोगंडा आहे असं म्हटलं होतं. पण, आता देशाच्या विविध भागांतून काश्मीर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला…खरंच माझे शब्द संपलेत, जे काही घडलंय ते ऐकून मी नि:शब्द झालोय.”

अभिनेते पुढे म्हणाले, “काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची विदारक दृश्य सध्या समोर येत आहेत. यातील एका फुटेजमध्ये एक महिला पतीच्या मृतदेहाच्या बाजूला हतबल होऊन बसल्याचं पाहायला मिळतंय…या सगळ्या गोष्टी पाहून खरंच मन बिथरुन जातं आणि मी हे कधीही विसरू शकत नाही. मी पल्लवी यांची मुलाखत ऐकली, त्या म्हणाल्या, जेव्हा माझ्या नवऱ्याला मारलं तेव्हा मी बोलले मलाही मारून टाका…पण, त्यांनी तसं केलं नाही. कारण, त्या दहशतवाद्यांना सर्वांना एक संदेश द्यायचा होता.”

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हात जोडून विनंती करतो की, यावेळी या दहशतवाद्यांना असा धडा शिकवला पाहिजे की, ते पुढील सात जन्मात असं कृत्य करण्याचं धाडस करणार नाहीत. जे झालंय ते अत्यंत चुकीचं आहे. गलत… गलत…गलत!!! पहलगाम हत्याकांड!! शब्द आज नपुंसक हैं!!” असं अनुपम खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.