बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे २०२२मध्ये हिंदी चित्रपटांना खूप मोठा फटका बसला. अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट विरोध आणि या ट्रेंडमुळे फ्लॉप झाले. अशा परिस्थितीत जावेद अख्तर यांनी बॉयकॉट बॉलिवूडबद्दल भाष्य केलंय. लेखकांनी बॉलिवूडला बॉयकॉट करू नये, त्यांनी लिहित राहावं, असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय.

जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपटांचं जागतिक स्तरावरील महत्त्व सांगितलं. भारतीयांच्या डीएनएमध्ये कथा आहेत, असंही ते म्हणाले. “बॉलिवूडला बॉयकॉट करून काहीही होणार नाहीये. आपला देश चित्रपटभक्तांचा देश आहे. मग ते भारतातील उत्तरेकडची लोक असो वा दक्षिणेकडची किंवा पूर्व-पश्चिम कोणत्याही भागातली असो. आम्हा भारतीयांचं चित्रपटांवर प्रेम आहे. आमच्या डीएनएमध्ये कथा आहे. कथा ऐकणं आणि ऐकवणं हे खूप पूर्वीपासून आमच्या डीएनएमध्ये आहे. आमच्या कथांमध्ये गाणीही आधीपासूनच असायची, आता नव्याने याची सुरुवात झालेली नाही, किंवा हिंदी चित्रपटांनी गाण्यांचा शोध लावलेला नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांचा आदर करा. फक्त हिंदीच नव्हे तर प्रत्येक भारतीय चित्रपटाचा आदर करा,” असं आवाहन जावेद अख्तर यांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “आमचे चित्रपट जगभरातील जवळपास १३५ देशांमध्ये प्रदर्शित होतात. जगात सद्भावनेचा प्रसार करण्यामध्ये भारतीय सिनेमा मोलाची भूमिका बजावतात. जगभरात हॉलिवूड कलाकारांपेक्षा आमच्या चित्रपट स्टार्सना ओळखलं जातं. तो देश श्रीमंत आहे, त्यामुळे त्यांचं बजेट जास्त आहे, हा भाग वेगळा. पण, इजिप्त, जर्मनी अशा कोणत्याही देशात तुम्ही गेलात तर आणि तुम्ही भारतीय आहात, असं सांगितलं की तुम्ही शाहरुख खानला ओळखता का? असा प्रश्न तिथले लोक विचारतात. आमचे कलाकार आणि आमचे चित्रपट भारताची मोठी पॉवर आहेत, त्यामुळे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे,” असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.