बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं फारच उत्तम होतं. ‘पठाण’ व ‘जवान’सारखे १००० कोटींहून अधिक कमाई करणारे चित्रपट शाहरुखने दिले. २०२३ हे वर्षं शाहरुख खानचं आहे असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ति होणार नाही. नुकतंच किंग खानच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना एक सरप्राइज दिलं. २ नोव्हेंबर म्हणजेच आपल्या वाढदिवशी शाहरुखने त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चा पहिला टीझर प्रदर्शित केला.

सोशल मीडियावर या टीझरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चाहते शाहरुखच्या या नव्या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यानिमित्ताने शाहरुख व राजकुमार हिरानी प्रथमच एकत्र काम करणार आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच याच्या कथेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडल्या होत्या. हा चित्रपट भारतातून अवैध पद्धतीने स्थलांतरित झालेल्या लोकांवर भाष्य करणार असल्याचं टीझरवरुन स्पष्ट झाले.

आणखी वाचा : मनीष मल्होत्राच्या पार्टीत त्याने डिझाईन केलेले कपडे परिधान केल्यावर सेलिब्रिटीज ते परत करतात; फराह खानने सांगितला किस्सा

आता नुकतंच जावेद अख्तर यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. ‘डंकी’साठी जावेद अख्तर यांनी एक गाणं लिहिलं आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधतांना त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. हे गाणं चित्रपटातील सर्वात महत्त्वाचं गाणं असून या गाण्यावरच चित्रपटाचा शेवट अवलंबून असल्याचं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर म्हणाले, “मी या चित्रपटासाठी केवळ एकच गाणं लिहिलं आहे. चित्रपट त्या गाण्यावर संपणार आहे. ते शेवटचं गाणं असून चित्रपटाची संपूर्ण थीम त्या गाण्यातूनच मांडण्यात आली आहे. राजू हिरानी यांची मी गाणं लिहावं अशी खूप इच्छा होती. आशा करतो की तुम्हालाही ते गाणं फार आवडेल. प्रीतम यांनी ते गाणं उत्तमरित्या संगीतबद्ध केलं आहे. सर्वसाधारणपणे मला चालीवर गाणी लिहायला सांगितली जातात, पण प्रीतम यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आधी मला गाणं लिहायला सांगितलं अन् मग त्याला चाल दिली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखचे चाहते आणि सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’च्या बरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर एक जाबरदस्त टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.