Jaya Bachchan Praises GrandSon Agastya Nanda : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा बॉलीवूडमध्ये आजोबा अमिताभ बच्चन आणि मामा अभिषेकप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख तयार करू पाहत आहे. २०२४ मध्ये त्याने ‘द अर्चिज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि आता तो एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता जया बच्चन यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फार सक्रिय असून ते अनेकदा त्यांच्या मुलाचं अभिषेक बच्चनचं कौतुक करत असतात. तर नुकतंच त्यांनी त्यांच्या नातवाचं अगस्त्यचंही कौतुक केलं. अगस्त्यच्या Ikkis या नवीन चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी त्याचं कौतुक करत एक्सवर पोस्ट शेअर केलेली. अशातच आता जया बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या नातवाचं कौतुक केलं आहे.
जया बच्चन यांनी केलं नातवाचं कौतुक
जया बच्चन यांनी ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना नातू अगस्त्य नंदाचं कौतुक केलं आहे. नातवाबद्दल त्या म्हणाल्या, “सुदैवाने अगस्त्य खूप पटकन गोष्टी आत्मसात करणारा आहे. त्याचे पालक कलाकार नाहीयेत, त्यामुळे तो त्याचे आजोबा आणि मामा यांच्याकडून अभिनयासाठी मार्गदर्शन घेतो. तुम्ही मला ओळखता, तुम्हाला माहीत आहे मी उगाच कोणाचं कौतुक करत नाही आणि माझ्या नातवंडांचं तर नाहीच; पण अगस्त्य खूप खास आहे. तो मुलगा खूप एकाग्रतेने लक्षपूर्वक काम करत आहे, जसं मी माझ्यावेळी केलं होतं.”
अगस्त्यने जोया अख्तरच्या ‘द अर्चिज’मधून पादर्पण केलं होतं, परंतु तो चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता थेट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला; त्यामुळे Ikkis हा त्याचा पहिला सिनेमा आहे, जो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास ठरणार आहे. अगस्त्यच्या या चित्रपटासाठी आजी-आजोबांबरोबर त्याचे वडील उद्योजक निखिल नंदा यांनीही फेसबुकवर पोस्ट करत मुलाचं कौतुक केलेलं.
श्रीराम राघवन दिग्दर्शित Ikkis मध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रही झळकणार असून यामध्ये अगस्त्यसह जयदीप अहलावत व सीमर भाटियाही झळकणार आहे. सीमर भाटिया अक्षय कुमारची पुतणी असून ती या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
