मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे तर कधी केलेल्या वक्तव्यामुळे या कलाकारांची चर्चा होताना दिसते. आता लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआरने जान्हवी कपूरबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे दोघे कलाकार ‘देवरा: पार्ट १’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
जान्हवी कपूरविषयी काय म्हणाला अभिनेता?
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याशी ‘देवरा पार्ट १’ चित्रपटाच्या टीमने संवाद साधला. त्यावेळी अभिनेता ज्युनिअर एनटीआरने जान्हवीबद्दल बोलताना म्हटले, “जान्हवी कपूर ही तिच्या आईसारखी दिसते, पण जेव्हा अभिनय करते त्यावेळी ती तिच्या आईची म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण करून देते.”
पुढे बोलताना अभिनेता म्हणतो, “मला आठवतं एक फोटोशूट होतं. ते एक प्रकारचे लूक टेस्टसाठी फोटोशूट होते. जान्हवी एका बोटमध्ये बसली होती आणि ती कॅमेराकडे बघत होती. तेव्हा ती अगदी श्रीदेवीसारखी दिसत होती. ती काही वैशिष्ट्यामुळे श्रीदेवीसारखी दिसते. मात्र जेव्हा ती हसते आणि ज्या प्रकारे ती अभिनय करते ते पाहिल्यानंतर श्रीदेवी यांची आठवण येते.”
देवरा चित्रपटात काम केल्याचा अनुभव सांगताना जान्हवीने म्हटले, “हे कसे सांगावे, स्पष्ट करावे मला माहित नाही. मात्र जेव्हा मी तेलुगुमध्ये काम केले तेव्हा मला घरी आल्यासारखे वाटले.”
महत्वाचे म्हणजे, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने अनेक तेलुगु चित्रपटात काम केले आहे. अनेक लोकप्रिय तेलुगु चित्रपटात श्रीदेवी महत्वाची भूमिकेत अभिनय करताना दिसली होती. दिग्गज अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्याबरोबर श्रीदेवी यांची जोडी प्रसिद्ध होती. आता त्यांचा नातू ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.
टदेवरा पार्ट १’ हा चित्रपट २७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आरआरआर’ या लोकप्रिय चित्रपटानंतर ज्युनिअर एनटीआरचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रचंड गाजल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे विशेष गाजले. या गाण्याला जागतिक पातळीवर प्रतिष्ठीत मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
आता ‘देवरा पार्ट १’ हा ‘आरआरआर’ चित्रपटासारखीच कमाल करणार का आणि जान्हवी कपूरचा हा पहिलाच तेलुगु चित्रपट असल्याने प्रेक्षकांना तिचा अभिनय आवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूरबरोबरच सैफ अली खानची महत्वाची भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.