Kader Khan And Amitabh Bachchan Friendship : ‘जिंदगी में तूफान आए, कयामत आए, लेकिन दोस्ती में दरार न आने पाए’ हा कादर खान यांचा गाजलेला डायलॉग. त्याचाच दाखला देत लोक मैत्रीची शपथ घेतात. ज्याने मैत्रीवर इतका ताकदीचा संवाद लिहिला, त्या माणसाने स्वतः किती प्रामाणिकपणे आणि मनापासून मैत्री निभावली असेल याचा सहज अंदाज येऊ शकतो. अशीच जीवाभावाची मैत्री होती, अमिताभ बच्चन आणि कादर खान यांची
१९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर कादर खान यांची अमिताभ बच्चन यांच्याशी मैत्री झाली. त्यानंतर ‘बेनाम’ (१९७४)पासून ते ‘हम’ (१९९१)पर्यंत जवळपास दोन दशके त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र येऊन काम केले. कादर खान यांनी या चित्रपटांसाठी संवाद लेखनही केले आणि अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्यासह भूमिकाही साकारल्या. परंतु, एक प्रसंग त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करणारा ठरला.
एका जुन्या मुलाखतीत कादर खान यांनी स्वत: हा प्रसंग सांगितला होता. ‘दिल ने फिर याद किया’ या कार्यक्रमात पत्रकार प्रशांत आंग्रे यांच्याशी संवाद साधताना कादर खान म्हणाले होते, “इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात येण्यासाठी विचारलं. मग ते निवडणूक लढले आणि खासदारही झाले; पण जेव्हा ते ‘खासदार’ ही ओळख घेऊन पुन्हा चित्रसृष्टीत आले, तेव्हा त्यांचं वागणं बदललेलं होतं.”
त्यानंतर कादर खान यांनी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते, “एकदा एका निर्मात्यानं मला विचारलं, ‘सरांना भेटलात का?’ मी विचारलं, ‘कोण सर?’. तर तो म्हणाला, ‘तुमचा मित्र अमिताभ बच्चन.’ मी म्हणालो, ‘मी त्याला कधीच सर म्हणालो नाही. मी कायम त्याला अमित म्हणतो.’ ते ऐकून तो निर्माता आश्चर्यचकित झाला आणि मला म्हणाला, ‘कृपया, त्याला पुढे सरच म्हणा.’”
“…त्यानंतर आमचं नातं संपलं : कादर खान
त्यावर कादर खान हसत म्हणालेले, “त्या क्षणानंतर आमचे मार्ग वेगळे झाले. तो ‘सरजी’ झाला आणि मी ‘कादरजी’ राहिलो. ज्याला मित्र मानलं त्याला अचानक ‘सर’ म्हणावं हे मला पटलंच नाही. त्यानंही मग मला टाळायला सुरुवात केली. फक्त मी त्याला ‘सर’ म्हणत नव्हतो म्हणून. त्यामुळे मी फार दुखावलो गेलो. कारण- मी त्याच्या चित्रपटासाठी इतर ऑफर्स नाकारल्या होत्या; पण जेव्हा त्याचं वागणं बदललं, तेव्हा आमचं नातं तिथंच संपलं.”
दरम्यान, कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘अमर अकबर अँथनी’ (१९७७), ‘परवरीश’ (१९७७), ‘मुकद्दर का सिकंदर’ (१९७८), ‘नसीब’ (१९८१) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी संवाद लिहिले होते. त्यांची जोडी बॉलीवूड इंडस्ट्रीतली लोकप्रिय जोडी होती.
