बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलिन तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कल्कीने एका मुलाखतीत बॉलीवूडबद्दल काही रंजक खुलासे केले आहेत. बॉलीवूडमध्ये बरेच लोक त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खूप पैसे खर्च करतात, असं कल्कीने सांगितलं. काही कलाकार प्रत्यक्षात लहान १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतात पण दाखवण्यासाठी महागड्या गाड्यांमध्ये फिरतात, असं कल्कीने नमूद केलं.

अलिना डिसेक्ट्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली, “वर्षानुवर्षे मी माझ्या स्विफ्टमध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी जायचे आणि माझा ड्रेस कारपेक्षा मोठा असायचा. ते माझी कार कार्यक्रमस्थळाच्या आत जाऊ देत नसत, ते माझी कार थांबवायचे आणि मग मला माझी निमंत्रण पत्रिका दाखवून त्यांना सांगावं लागायचं, ‘ही मी आहे.'”

कल्की पुढे म्हणाली, “मला माझे आयुष्य माझ्या अटींवर जगायचे आहे. जेव्हा तुमच्याकडे कोणतेही बॉडीगार्ड किंवा इतर अनावश्यक गोष्टी नसतात तेव्हा लोक तुम्हाला ओळखतीलच असं नाही. विमानतळावर तर मोठी समस्या उद्भवते, कारण तिथे नेहमीच सेल्फीसाठी रांग असते. बरेचदा विमानतळावर माझे दीड तास गेले आहेत, कारण लोक एकामागोमाग एक सेल्फीसाठी येत असतात.”

पीआर व बॉडीगार्ड्स गरजेचे आहेत का?

कलाकारांना रिलेव्हंट राहण्यासाठी पीआर व प्रतिमा निर्माण करणं महत्त्वाचं आहे का आणि त्याचा तिला मिळणाऱ्या संधींवर परिणाम होतो का? असं विचारल्यावर ती म्हणाली, “हे एका विशिष्ट प्रमाणात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मोठे कलाकार असाल तर सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे, कारण मोठ्या स्टार्ससाठी त्यांचे काही चाहते वेडे असतात, म्हणून मला वाटतं काही लोकांसाठी बॉडीगार्ड्स व पीआर आवश्यक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

1BHK मध्ये राहतात, पण ऑडीने फिरतात

इंडस्ट्रीत काही कलाकार आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी खूप टोकाच्या गोष्टी करतात, असा खुलासा कल्कीने केला. “मला असे लोक माहीत आहेत जे एका छोट्याशा १ बीएचकेमध्ये राहतात, पण त्यांच्याकडे ऑडी असते. ते ड्रायव्हरसह ऑडीमध्ये मीटिंगसाठी येतात, पण एका छोट्याशा खोलीत राहतात. माझ्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे. मी पैसे खर्च करते, पण गोव्यात एका सुंदर घरात राहण्यासाठी आणि मुंबईला ये-जा करण्यासाठी. मी माझे सर्व पैसे तिथेच खर्च करते,” असं कल्की कोचलिन म्हणाली.