Kantara Chapter 1 Trailer: नुकताच ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि त्याची प्रमुख भूमिका असलेला कांतारा: चॅप्टर १ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारा चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘कांतारा: चॅप्टर १’ कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर मात्र त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, हे जाणून घेऊ…
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने एक्सवर कमेंट करत लिहिले, “कांतारा: चाप्टर १ चा ट्रेलर आवडला. हा असा सिनेमा आहे, जो फक्त पैसे मिळवण्यासाठी बनवला नसून त्यामध्ये एक कथा आहे. आता चित्रपटात नेमके काय दाखवले आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. ट्रेलरमधील सीन आवडले.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “काही फ्रेम्स फक्त कथा सांगत नाहीत, त्या प्रार्थनेसारख्या वाटतात.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.”


तर काही नेटकऱ्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “कांतारा चित्रपट अद्भुत होता. त्यामध्ये वापरलेले बीजीएम आणि व्हीएफएक्स जबरदस्त होते. कांतारा चॅप्टर १ मध्ये हे दिसत नाही. ट्रेलरमध्ये मंत्रमुग्ध करणारे सीन नाहीत. आता चित्रपट कसा असेल, हे पाहणे महत्वाचे आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “काही फ्रेम्स दर्जेदार दिसत आहेत. पण ट्रेलर कट निराशाजनक वाटला. कथादेखील सामान्य वाटत आहे. पण तरीही चित्रपटात रहस्ये दडलेली असतील, अशी आशा आहे.”


कांतारा चॅप्टर १ च्या ट्रेलरबद्दल बोलायचे तर कांताराच्या पहिल्या भागाचा जिथे शेवट झाला होता, तिथून या ट्रेलरची सुरुवात होते. संपूर्ण अंधारात दिवट्यांचा थोडासा प्रकाश दिसतो. एक लहान मुलगा विचारतो की माझे वडील इथेच का अदृश्य झाले? त्यानंतर काही मंत्र ऐकायला मिळतात. एक व्यक्ती त्याला सांगतो की बाळा, हेच आपलं मूळ आहे. आपले पूर्वज इथेच राहत होते. ती एक दंतकथा आहे. यादरम्यान, डोंगर दऱ्यांनी वेढलेला निसर्ग पाहायला मिळतो. राजवाडा, राजा त्याची प्रजा पाहायला मिळते. मुलगा विचारतो की कोणती दंतकथा?
ट्रेलरमध्ये पुढे पाहायला मिळते की काही महिला आणि पुरुष नदीच्या पात्रातून जात असताना त्यांना एक दगड सापडतो. तो पवित्र दगड असल्याचे म्हटले जाते.पुढे असे ऐकायला मिळते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो. त्यावेळी धर्माचे सरंक्षण करण्यासाठी देव त्याचे दूत पृथ्वीवर पाठवतो. त्यानंतर एका लहान बाळ दिसते. त्याभोवती एक वाघ फिरत असतो. सर्व गावकरी एकत्र जमले असून त्या लहान बाळाचे नाव बर्मे असे ठेवले जाते.
त्यानंतर एक व्यक्ती म्हणतो की, मला यायला उशीर तर झाला नाही ना? एक व्यक्ती सांगतो की कांतारामध्ये कधीही जाऊ नकोस.तिथे ब्रम्हराक्षस राहतो. ट्रेलरमध्ये पुढे मारामारी, गाणी, डान्स, युद्ध तसेच गोष्टीमध्ये विविध रहस्ये असलेली दिसत आहेत.
तसेच, जबरदस्त अॅक्शन सीनदेखील पाहायला मिळत आहेत. शेवटी एक महिला विचारते की इथे देव आला होता का? त्यावर एक व्यक्ती तिला सांगतो की तो इथेच राहत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
