Kantara Chapter 1 Trailer released: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. देशभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. त्यामुळे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पुढचा भाग कधी पाहायला मिळणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती.

‘कांतारा: चॅप्टर १’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

आता चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ‘कांतारा : चॅप्टर १’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘कांतारा’च्या पहिल्या भागाचा जिथे शेवट झाला होता, तिथून या ट्रेलरची सुरुवात होते. संपूर्ण अंधारात दिवट्यांचा थोडासा प्रकाश दिसतो.

एक लहान मुलगा विचारतो की, माझे वडील इथेच का अदृश्य झाले? त्यानंतर काही मंत्र ऐकायला मिळतात. एक व्यक्ती त्याला सांगते की, बाळा, हेच आपलं मूळ आहे. आपले पूर्वज इथेच राहत होते. ती एक दंतकथा आहे. यादरम्यान, डोंगरदऱ्यांनी वेढलेला निसर्ग पाहायला मिळतो. राजवाडा, राजा त्याची प्रजा पाहायला मिळते. मुलगा विचारतो की, कोणती दंतकथा?

ट्रेलरमध्ये पुढे पाहायला मिळते की, काही महिला आणि पुरुष नदीच्या पात्रातून जात असताना त्यांना एक दगड सापडतो. तो पवित्र दगड असल्याचे म्हटले जाते. पुढे असे ऐकायला मिळते की, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो. त्यावेळी धर्माचे सरंक्षण करण्यासाठी देव त्याचे दूत पृथ्वीवर पाठवतो. त्यानंतर एका लहान बाळ दिसते. त्याभोवती एक वाघ फिरत असतो. सर्व गावकरी एकत्र जमले असून, त्या लहान बाळाचे नाव बर्मे, असे ठेवले जाते.

त्यानंतर एक व्यक्ती म्हणते की, मला यायला उशीर तर झाला नाही ना? एक व्यक्ती सांगते की, ‘कांतारा’मध्ये कधीही जाऊ नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो. ट्रेलरमध्ये पुढे मारामारी, गाणी, डान्स, युद्ध, तसेच गोष्टीमध्ये विविध रहस्ये असल्याचे दिसत आहे. तसेच, जबरदस्त अ‍ॅक्शन सीनदेखील पाहायला मिळत आहेत. शेवटी एक महिला विचारते की, इथे देव आला होता का? त्यावर एक व्यक्ती तिला सांगते की, तो इथेच राहत आहे. तसेच, ट्रेलरमध्ये जे संगीत ऐकायला मिळत आहे, तेदेखील लक्ष वेधून घेत आहे. हा जबरदस्त ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचे, तर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने युद्धाचा सीन तयार केला आहे. त्यामध्ये ५०० हून अधिक फायटर्स आणि ३,००० इतर लोक सहभागी झाले आहेत. या सीनचे शूटिंग २५ एकर शहरात, खडकाळ जमिनीवर ४५-५० दिवसांत करण्यात आले आहे.

हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमीळ, बंगाली व इंग्रजी या भाषांत प्रदर्शित होणार आहे. आता ‘कांतारा’प्रमाणेच, ‘कांतारा : चॅप्टर १’लादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.