Karan Singh Grover on Depression: करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. २०१६ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना देवी ही मुलगी आहे. हे कलाकार अनेकदा त्यांचे, त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

सध्या करण सिंग ग्रोवरच्या आयुष्यात आनंद असला तरी त्याच्या आयुष्यात एक काळ असाही होता, जेव्हा त्याला अडचणींचा सामना करावा लागला. अभिनेत्याने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला नैराश्याचा सामना करावा लागला, असा खुलासा केला.

“आपण सर्वजण कधी ना कधी…”

अभिनेता म्हणाला, “नैराश्य ही अशी गोष्ट आहे, जी आपण स्वीकारली पाहिजे. सर्वांनी त्यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण कधी ना कधी यातून जातो. कधीकधी नैराश्य हे पैसे कमवण्याच्या संघर्षामुळे, कधी तणावामुळे येते. आपल्या मनावर खूप दबाव निर्माण होतो. पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. जीवन यापेक्षा मोठे आहे.” पुढे अभिनेता असेही म्हणाला, “पत्नी बिपाशा बसूमुळे नैराश्यातून बाहेर येणे सोपे झाले. तिची या सगळ्यात मदत झाली.

करण असेही म्हणाला की मी खूप काळ नैराश्याचा सामना केला आहे. त्यामुळेच मी मानसिक आरोग्याबद्दल खूप वेळा बोलतो. नैराश्याची अनेक कारणे असू शकतात. ती शोधणे, त्यावर काम करणे महत्वाचे असते.

करण सिंग ग्रोव्हरने २०१५ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी त्याने टेलिव्हिजन माध्यमात काम केले. अनेक मालिकांमधून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. ‘दिल मिल गये’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुबूल है’ या मालिकांमधून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिका प्रचंड गाजल्या.

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ या सिनेमात तो दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत दिसले होते. याबरोबरच अनिल कपूर यांनी या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. आता आगामी काळात करण कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, बिपाशा सध्या चित्रपटांपासून दूर असल्याचे दिसते. अनेकदा हे जोडपे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येते.