Kareena Kapoor & Saif Ali Khan Were Upset With Sanjay Leela Bhansali For Dropping Them From Devdas: कलाकार म्हटलं की, अनेक वेळा असे होताना दिसते की, हातात आलेली कामे काही कारणांमुळे दुसऱ्या कलाकाराकडे जातात. बऱ्याचदा असे पाहायला मिळते की, कुठल्या तरी कलाकृतीसाठी आधी वेगळ्याच कलाकाराला पसंती असते; पण नंतर काही कारणांनी दुसराच कलाकार त्यात दिसतो. असेच काहीसे झालेले अभिनेता सैफ अली खान व करीन कपूरबरोबर.
सैफ अली खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर नायकाच्या, तसेच सहायक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या आहेत. सैफने त्याच्या अभिनयाने अनेकांची पसंती मिळवली. परंतु, एकदा तो एका गाजलेल्या चित्रपटाचा भाग होण्यापासून मुकला. हा चित्रपट होता संजय लीला भन्साळी यांचा ‘देवदास’. शाहरुख खान, माधुरी दीक्षित व ऐश्वर्या राय यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट. त्यामध्ये सैफसुद्धा झळकणार होता; परंतु संजय लीला भन्साळींबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी अभिनेत्याला न विचारताच त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली. त्याबाबत सैफने एका मुलाखतीत सांगितले होते.
सैफ अली खान व संजय लीला भन्साळी यांच्यामध्ये झालेले मतभेद
निलुफर कुरेशीसह संवाद साधताना सैफने याबाबत सांगितले होते. तो म्हणालेला, “संजयला असं वाटतं की, मी मूर्ख आहे; पण मी ‘देवदास’ची ऑफर नाकारली नव्हती. आमच्यामध्ये पैशांना घेऊन मतभेद झाले होते. मी काही खूप मोठी मागणी केली नव्हती; पण संजयनं माझ्याशी पुन्हा संपर्कच साधला नाही. माझ्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न न करता आणि पैशांबाबत कुठलीही चर्चा न करता, त्यानं विषयच संपवला. मी स्वत: फोन करून चौकशी केली तेव्हा मला कळलं की, पैशांबाबत कुठलीही बोलणी होऊ शकत नाहीत. तोपर्यंत कोणीही मला काहीच सांगितलं नव्हतं.”
याच मुलाखतीत सैफ अली खान असेही म्हणालेला, “मला वाटतं त्या चित्रपटासाठी माझी निवड चुकीची ठरली असती. चुनीलालच्या भूमिकेत मी सूट झालो नसतो.” नंतर या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांनी अभिनेते जॅकी श्रॉफ यांची निवड केली. सैफ अली खानची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूरचंही संजय यांच्याबरोबर एकदा देवदास’ चित्रपटावरून बिनसले होते.
करीना कपूरने व्यक्त केलेली नाराजी
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत करीना याबाबत म्हणालेली, “संजयनं या चित्रपटासाठी माझी स्क्रीन टेस्ट घेतली होती. मला चेकही दिला होता; पण नंतर त्यांनी ऐश्वर्या रायची निवड केली. मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. कारण- माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी माझ्याबरोबर असं केलं. तेव्हा मी ठरवलं की, माझ्याकडे काही काम नसलं तरी मी कधीच त्यांच्याबरोबर काम करणार नाही.”