What Amitabh Bachchan said about Karisma Kapoor: अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही दिवसांत त्यांचा मुलगा अभिषेक याचे अनेकदा कौतुक केले आहे. अभिषेकने आतापर्यंतच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या, त्याबद्दल त्यांनी त्याचे वडील म्हणून अभिमान असल्याचे सांगितले.
आता अमिताभ बच्चन हे त्यांच्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी करिश्मा कपूर व अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. जेव्हा करिश्मा व अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला नव्हता, त्यावेळी करिश्मा कपूर आधीच घरातील सदस्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अमिताभ बच्चन काय म्हणालेले?
बिग बींनी रेडिफला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना विचारलेले की अभिषेक व करिश्माचे लग्न थाटामाटात होणार का? यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, “खूप मोठे लग्न होईल असे काही नाही, आमची दोन्ही कुटुंबे एकत्र बसतील आणि कशा पद्धतीने लग्न करायचे आहे यावर विचार करतील. कोणती तारीख सर्वांसाठी योग्य आहे ते निवडावे लागेल. सध्या बबिता त्यांची लहान मुलगी करीनाबरोबर न्यूझीलंडमध्ये आहे. ते परत आले की नेमके कशापद्धतीने लग्न करायचे आहे, मुलांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एकत्र बसून चर्चा करू, त्यानंतर लग्नाबाबत ठरवू.”
कपूर आणि बच्चन ही दोन्ही कुटुंबे अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने ते त्यांच्या कामात होते. जेव्हा अभिषेक आणि करिश्माच्या लग्नाची बोलणी सुरू होती, त्यावेळी अभिषेक आणि करीना ‘मैं प्रेम की दिवानी हूँ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. हे शूटिंग न्यूझीलंडमध्ये सुरू होते; तर करीश्माचे वडील रणधीर कपूर मॉरिशसमध्ये ‘अरमान’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते, अमिताभ बच्चनदेखील या सिनेमाचा भाग होते.
करिश्मा आणि अभिषेकच्या साखरपुड्याबद्दल बिग बी म्हणालेले, “माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या मुलाचा साखरपुडा होताना पाहणे, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट असेल. सगळ्यांची सहमती असेल तर आम्ही लवकरात लवकर साखरपुडा करू.”
करिश्माबद्दल अमिताभ बच्चन म्हणालेले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर करिश्मा आधीच आमच्या घरातील सदस्य बनली आहे. ती माझी सून आहे आणि आमच्या घराचा भाग आहे. पण, लग्नाचे विधी करणे बाकी आहे, अशा औपचारिकता पाळाव्या लागतील.”
ज्या लग्नाची इतकी चर्चा झाली, ते लग्न मात्र होऊ शकले नाही. अभिषेक व करिश्माचा साखरपुडा मोडला. त्यानंतर काही वर्षांनी करिश्माने उद्योगपती संजय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.
करिश्माने २००३ मध्ये संजयशी लग्न केले आणि त्यांना कियान आणि समायरा कपूर अशी दोन मुले आहेत. मात्र, त्यांचा २०१६ साली घटस्फोट झाला. जून २०२५ मध्ये संजय कपूरचे निधन झाले. अभिषेक बच्चनने २००७ मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न केले आणि त्यांना आराध्या बच्चन नावाची एक मुलगी आहे.
दरम्यान, अभिषेक नुकताच कालिधर लापता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील भूमिकेचे प्रेक्षक, समीक्षकांकडून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळाले.